भीती न बाळगता कोरोनावर मात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:20 AM2021-03-14T04:20:23+5:302021-03-14T04:20:23+5:30
जवळे : कोरोनाने देशासह जगापुढे मोठे संकट उभे केले आहे. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती न ...
जवळे : कोरोनाने देशासह जगापुढे मोठे संकट उभे केले आहे. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता कोरोनावर मात करावी, असे आवाहन मोहनानंद परांदावडेकर महाराज यांनी केले.पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे संत निळोबाराय महाराज समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्याचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ! हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी’ अशा संत निळोबाराय महाराजांच्या गाथेतील अभंगाचे ते निरुपण करत होते. संत निळोबाराय महाराज यांनी सोळा दिवस अनुष्ठान करून परमेश्वराला प्राप्त केले. परंतु, निळोबाराय यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची भेट पाहिजे होती. त्यामुळे त्यांनी परमेश्वरालाही परत पाठविले व सद्गुरु तुकाराम महाराज यांच्या भेटीनंतरच आपले प्राण सोडले. अशी ही गुरू-शिष्याची ख्याती आहे. त्यामुळे गुरू निष्ठा असावी तर निळोबाराय महाराजांसारखी, असे परांदावडेकर महाराज यांनी सांगितले.
निळोबाराय महाराजांच्या समाधीचे पूजन निळोबाराय सेवा मंडळ सचिव चांगदेव शिर्के, वीणा पूजन पांडुरंग रासकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष अशोक सावंत म्हणाले, कोरोना प्रादुर्भावामुळे केवळ पन्नास भाविकांच्या उपस्थितीत कीर्तन महोत्सव सोहळा होत आहे. समाधी सोहळ्याच्या दिवशीही भाविकांना मंदिर व परिसरात प्रवेश बंदी आहे. भाविकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे व मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी निळोबाराय पंढरपूर सेवा मंडळ अध्यक्ष दादासाहेब पठारे, निळोबारायांचे वंशज विठ्ठल काका मकाशीर, ज्ञानदेव महाराज खामकर, गहिनीनाथ लोंढे, संपतराव सावंत, पंढरीनाथ रासकर, रामराव पवार, संपत भिका रासकर, नामदेव गाजरे, गणेश महाराज शेंडे, माजी सरपंच भाऊसाहेब लटांबळे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब लटांबळे, मृदुंगमणी गणेश महाराज, पेटी वादक दत्तात्रय सोनवणे आदी उपस्थित होते.