प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर युवकाची म्युकरमायकोसिसवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:20+5:302021-06-17T04:15:20+5:30
विसापूर : चिंभळे (ता. श्रीगोंदा) येथील एका युवकाने प्रचंड इच्छाशक्ती, डॉक्टरांचे योग्य उपचार, गावकऱ्यांची आर्थिक मदत यामुळे म्युकरमायकोसिसवर मात ...
विसापूर : चिंभळे (ता. श्रीगोंदा) येथील एका युवकाने प्रचंड इच्छाशक्ती, डॉक्टरांचे योग्य उपचार, गावकऱ्यांची आर्थिक मदत यामुळे म्युकरमायकोसिसवर मात केली आहे.
गणेश ज्ञानदेव गायकवाड (रा. चिंभळे, ता. श्रीगाेंदा) असे त्या युवकाचे नाव आहे. गणेशला १७ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. दौंड येथे एका रुग्णालयात त्याने कोरोनावर उपचार घेतले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्याला २६ एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला. नंतर चार दिवसांनी त्याची दाढ दुखू लागली. डोळ्यांनाही त्रास होऊ लागला. ही म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लक्षणे असल्याचे लक्षात येईपर्यंत एक डोळा निकामी झाला. तो डोळा शस्त्रक्रिया करून काढावा लागला. दुसऱ्या डोळ्यात संसर्ग वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याला नगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. गणेशच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे पुढील उपचार कसे होणार अशी चिंता त्याच्या व कुटुंबीयांपुढे हाेती.
त्यातच चिंभळे गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या हरित परिवाराच्या सदस्यांनी व युवकांनी त्याच्या उपचारांसाठी मदतीची हाक दिली. ‘लोकमत’नेही गणेशच्या आजारपण व आर्थिक परिस्थितीबाबत बातमीच्या माध्यमातून प्रसिद्धी देऊन मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांनी लाखो रुपयांची मदत एकत्रित केली. त्यातून पुढील उपचार घेणे सोपे गेले. डाॅक्टरांचे योग्य उपचार, चिंभळेकरांची मिळालेली आर्थिक मदत, प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर गणेशला जीवदान मिळाले. िीदीड महिन्याच्या उपचारांनंतर गणेश दोन दिवसांपूर्वी ठणठणीत बरा होऊन घरी परतला.
---
हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता होती. घरची परिस्थिती बेताचीच होती. या कालावधीत हरित परिवार, एसएससीचे विद्यार्थी मित्र, ग्रामस्थ, इतर मित्र परिवार यांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे या जीवघेण्या आजारातून बरा होऊन घरी आलो आहे. सर्वांनी केलेली मदत कधीच विसरू शकत नाही.
- गणेश गायकवाड, चिंभळे