कोरोनावर मात करीत सुप्यातील कारखान्यांची धडधड सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:22 AM2021-04-20T04:22:37+5:302021-04-20T04:22:37+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीत कोरोनावर मात करीत कारखान्यांची धडधड सुरू आहे. उत्पादन प्रक्रिया सुरूच ठेवण्यात कारखान्याचे ...
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीत कोरोनावर मात करीत कारखान्यांची धडधड सुरू आहे. उत्पादन प्रक्रिया सुरूच ठेवण्यात कारखान्याचे प्रशासन व कामगार यांना यश मिळाले असले तरी त्यासाठी कारखान्यांचे प्रशासन खबरदारीच्या सर्व उपाययोजना काटेकोरपणे राबवित आहे. ते कोरोना चेन ब्रेक करण्याच्या प्रयत्न करताना दिसतात.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात अनेक परप्रांतीय कामगार तसेच दुसऱ्या जिल्ह्यातून कामानिमित्त आलेले उद्योजक, नोकरदार, कामगार यांची मोठ्या प्रमाणावर घरवापसी झाली. त्याचा परिणाम उद्योग क्षेत्रावर होऊन त्यावेळी अनेक कारखान्यांची चक्रे जागेवर थांबली होती. परिणामी, कारखानदार, उद्योग क्षेत्र, आर्थिक प्रगती व कामगार या सर्वांना त्याचा फटका बसला. यावेळी मात्र कारखान्याचे मालक सतर्क झाले. त्यांच्या प्रशासनाच्या मदतीने कोरोना प्रतिबंधक उपाय योजना राबवण्यासाठी प्रयत्न केल्याने कामगाराच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला व कारखाने चालू ठेवण्यात यश मिळाल्याचे सुपा इंडस्ट्रीयालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनुराग धूत यांनी सांगितले.
सुरवातीलाच कारखान्यांनी त्यांच्या कामगारांची कोरोना चाचणी करून घेतली व जे पॉझिटिव्ह निघाले त्यांना उपचारासाठी पाठवून दिले. त्यांची विचारपूस, त्यांना लागणारी मदत केल्याने उरलेले जे कामावर येऊ इच्छितात त्यांची तपासणी, मास्क, सॅनिटायझर, तापमान, ऑक्सिजन पातळी आदी गोष्टी तपासून खबरदारी घेतली. त्यामुळे पूर्ण क्षमतेने नसले तरी उत्पादन व्यवस्थितपणे सुरू ठेवण्यात यश आल्याचे विस्तारित एमआयडीसीतील मिंडा कारखान्याचे व्यवस्थापक उल्हास नेवाळे यांनी सांगितले.
येथीलच कॅरीअर मायडियामध्येही नियोजन करून काम सुरू ठेवल्याने उत्पादन प्रक्रिया ५० टक्के चालू असून कुठेही गर्दी होणार नाही, यासाठी बॅचेस पाडून कॅन्टीन सुविधा सुरू आहे. याशिवाय मोठी जागा असल्याने कामकाज सुरळीत चालू ठेवून कोरोना प्रतिबंधक उपाय राबविल्याचे एचआर गौतम साबळे यांनी सांगितले.
जुन्या एमआयडीसीतील जाफा हा पशुखाद्य निर्मितीचा मोठा प्रकल्प असून तो पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यात यश आल्याचे व्यवस्थापक नेमिनाथ सुतार यांनी सांगितले. कारखान्यातील माझ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी कारखान्याने स्वखर्चातून कामगारांची तपासणी करून घेतली. ज्यांना पॉझिटिव्ह लक्षणे असतील त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले उर्वरित कामगारांच्या माध्यमातून ईपीटॉम कारखाना सुरू असून स्वतः रोज कारखान्यात उपस्थित राहून सर्वांची काळजी घेत कामकाज चालल्याचे संचालक अनुराग धूत यांनी सांगितले. आम इंडियातील बधितांवर उपचार करण्यासाठी त्यांना सुट्टी दिल्याचे सांगून येतील त्या कामगारांच्या सहाय्याने उत्पादन प्रक्रिया सध्या तरी सुरू आहे. ते प्रमाण घटले असले तरी थांबले नाही, असे एचआर संदीप गोखले यांनी सांगितले.
कारखान्यातील उत्पादन पूर्ण क्षमतेने होत नसले तरी मागच्या प्रमाणे ते ठप्प झाले नाही. यात सरकारी यंत्रणा मदत करताना दिसतेय.
--
सुपा एमआयडीसीतील कारखानदारांच्या काही अडचणी असतील तर सरकारी प्रशासनाच्या मदतीने व संघटनेच्या माध्यमातून त्यातून मार्ग काढण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील.
-अनुराग धूत,
अध्यक्ष, सुपा इंडस्ट्रीयालिस्ट असोसिएशन