त्रुटींवर मात करीत वृद्धेश्वरचे गाळप यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:19 AM2021-05-24T04:19:28+5:302021-05-24T04:19:28+5:30
तिसगाव : ऊसाची विपुल उपलब्धता, साखरेला मिळणारा कमी बाजारभाव व मागणीही अत्यल्प अशी या हंगामात स्थिती होती. याही स्थितीत ...
तिसगाव : ऊसाची विपुल उपलब्धता, साखरेला मिळणारा कमी बाजारभाव व मागणीही अत्यल्प अशी या हंगामात स्थिती होती. याही स्थितीत वृद्धेश्वर साखर कारखान्याने सर्व त्रुटींवर मात करीत गाळप हंगाम यशस्वी केला, असे प्रतिपादन अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी केले.
शनिवारी सकाळी कारखान्याच्या गळीताची सांगता संचालक मंडळाच्या हस्ते विधिवत गव्हाणपूजा व ऊसाची शेवटची मोळी टाकून करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष रामकिसन काकडे, शेती समितीचे अध्यक्ष उद्धवराव वाघ, ज्येष्ठ संचालक सुभाषराव ताठे, सुभाष बुधवंत, डॉ. यशवंत गवळी, विधिज्ञ अनिल फलके, बाबासाहेब किलबिले, शरद अकोलकर आदी उपस्थित होते.
राजळे म्हणाले, प्रतिकूलतेतच संधी शोधत कारखान्याची कायम वाटचाल राहिली आहे. या हंगामात इथेनॉल उपपदार्थ निर्मिती करावयाचीच आहे. त्या अनुषंगाने संचालक मंडळाने पावले उचलली आहेत. या हंगामात ५ लाख २१ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन ५ लाख ५१ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. हे कारखान्याचे सांघिक यश आहे.
सर्व कर्मचाऱ्यांना दहा दिवसांचे वेतन बक्षीस स्वरुपात देण्यात येईल, अशी घोषणा संचालक राहुल राजळे यांनी केली. कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या १९ कामगारांचा प्रसंगी सपत्नीक सन्मान करण्यात आला. सत्काराने कामगार भारावले. उद्धवराव वाघ यांचे भाषण झाले. कार्यकारी संचालक जालिंदर पवार यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत मिसाळ यांनी आभार मानले. सरव्यवस्थापक भास्करराव गोरे, प्रशासकीय अधिकारी विनायक म्हस्के, लेखापाल संभाजी राजळे, आदीनाथ राजळे, अंकुश राजळे, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार हजर होते.
---
२३ वृद्धेश्वर
ऊसाची मोळी टाकून वृद्धेश्वर कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता करण्यात आली.