ट्रॅक्टर नसलेल्या शेतकऱ्यांसाठी बैलचलित ऊस आंतरमशागत यंत्र ठरतेय वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:20 PM2018-12-20T12:20:03+5:302018-12-20T12:20:27+5:30
ग्रासरूट इनोव्हेटर : शेतकऱ्यांना खर्च वाचविण्यासाठी या यंत्राचा मोठा उपयोग होत असून, उत्पन्नातही वाढ होत आहे.
- अनिल लगड (अहमदनगर)
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बैलाच्या साहाय्याने चालविले जाणारे ऊस आंतरमशागत यंत्र विकसित केले आहे. ट्रॅक्टर नसलेल्या शेतकऱ्यांना खर्च वाचविण्यासाठी या यंत्राचा मोठा उपयोग होत असून, उत्पन्नातही वाढ होत आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यंत्राच्या साह्याने शेतीत नवनवीन प्रयोग केले जातात. बहुतेक ठिकाणी ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची नांगरट, पाळी, पेरणी, अशी मशागत केली जाते. यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो. खर्चामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. उत्पादन खर्च वाढला की, शेतीतील तोट्याचे प्रमाण वाढते. यामुळे शेती परवडत नाही. यामुळे अनेक शेतकरी बैलशेतीला प्राधान्य देतात. बैलांच्या साह्यानेच शेतीची मशागत करीत असतात. खरे तर आजच्या काळात आधुनिक तंत्रानेच शेती केली पाहिजे; परंतु ती खर्चिक असते. अनेक शेतकऱ्यांना ती परवडत नाही, तसेच यंत्राच्या साहाय्याने शेतीतील छोटी-छोटी कामे करायची झाल्याने अजूनही बैलांची आवश्यकता भासते.
ज्या भागात धरणाचे पाणी आहे. सिंचनाचे पाणी उपलब्ध आहे, अशा भागातील शेतकरी ऊस शेती मोठ्या प्रमाणात करतात. ऊस शेतीत आंतरमशागत महत्त्वाची असते. ही मशागत ट्रॅक्टरसारख्या यंत्राद्वारेही करता येते, तसेच बैलचलित यंत्रानेही केली जाते. यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बैलचलित फुले ऊस आंतरमशागत यंत्र विकसित केले आहे. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे ऊस पिकातील गवत काढणे, आंतरमशागत आणि भर देण्यासाठी उपयुक्त आहे. दोन ओळींमधील अंतर ९० ते १०० सेंटीमीटर असणाऱ्या उसासाठी उपयुक्त आहे. वजनाला हलके, जलदगतीने जोडणी करता येते. बैलजोडीने सहज ओढले जाते. हे यंत्र शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर ठरले आहे.