ऑक्सिजनचे बेड फुल्ल; नातेवाईकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:19 AM2021-04-12T04:19:29+5:302021-04-12T04:19:29+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर रुग्णांना आवश्यक असणारे ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटरचे बेड फुल्ल ...
अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर रुग्णांना आवश्यक असणारे ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटरचे बेड फुल्ल झाले आहेत. बेड नसल्याने रविवारी शहरातील बहुतांश रुग्णालयांनी पेशंट दाखल करून घेण्यास नकार दिला. शहरातील १० ते १५ रुग्णालयांत फिरूनही बेड मिळत नव्हते. जिल्हा शासकीय रुग्णालयांतही व्हेंटिलेटरचे बेड नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरुच होती.
नगर शहरात ३४ खासगी रुग्णालयांत कोविड सेंटर कार्यरत आहेत. या रुग्णालयांत ऑक्सिजनचे ५५०, आयसीयूचे ३८५ आणि व्हेंटिलेटरच्या १३१ बेडची सुविधा आहे. हे सर्व बेड कोरोना रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. संबंधित रुग्णालयांनी तशी माहिती महापालिकेला कळविली आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागते. जिल्हाभरातून कोरोनाचे गंभीर रुग्ण मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहेत; परंतु, त्यांना बेड मिळणे कठीण झाले आहे. रुग्णाला त्रास होतो, असे सांगून नातेवाईक विनवणी करतात. परंतु, बेड शिल्लक नाही, नाव आणि नंबर देऊन जा, खाली झाल्यानंतर तुम्हाला फोन करू, असे त्यांना सांगितले जाते. बहुतांश रुग्णालयांत ऑक्सिजनसाठी वेटिंग लिस्ट तयार करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात अतिगंभीर रुग्ण आल्यास त्यांना बेड दिले जात असल्याने प्रतीक्षा यादीतील रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णालयांबाहेर रांगा लागल्या आहेत. ज्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो, अशा रुग्णांना कुठे दाखल करायचे, असा प्रश्न नातेवाईकांसमोर आहे. इतर जिल्ह्यांत याहीपेक्षा वाईट स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना उपचार घेणे कठीण झाले असून, दररोज दोन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे खासगी आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. शासकीय कोविड सेंटरमध्ये बेड आहेत; परंतु, तिथे ऑक्सिजनची सुविधा नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयांतही कमालीची गर्दी आहे. सर्वसामान्यांची बेड मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे.
.....
शहरातील २०३ खासगी रुग्णालयांतील ८० टक्के बेड राखीव
खासगी कोविड सेंटरमधील बेड फुल्ल झाल्याने महापालिकेने शहरातील इतर २०३ रुग्णालयांना ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी तीन हजारांहून अधिक बेड उपलब्ध होणार आहेत. असे असले तरी ऑक्सिजनच्या बेडचा तुटवडा निर्माण होणार असून, हे बेड उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
......
खासगी रुग्णालयांकडे रुग्णांचा कल
शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजनसह इतर सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. परंतु, खासगी रुग्णालयांत बेड शिल्लक नसल्याने रुग्णांचे नातेवाईक धास्तावलेले आहेत.
...
मनपाच्या कोविड सेंटरमध्ये ३१४ बेड शिल्लक
लक्षणे नसणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून घेतले जात आहेत. या सेंटरमध्ये ३१४ बेड शिल्लक आहेत. परंतु, गंभीर रुग्णांवर एकमेव जिल्हा शासकीय रुग्णालयांत उपचार केले जात असून, तिथेही गर्दी वाढली आहे.
......
१० ते १२ स्कोअर असलेल्या रुग्णांना लागतो ऑक्सिजन
ज्या रुग्णांचा एचआर सिटी स्कोअर १० ते १२ आहे, अशा रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडते तसेच १६ ते २५ स्कोअर असलेल्यांना व्हेंटिलेटरची गरज असते. या रुग्णांचे प्रमाण सध्या जास्त आहे. त्यामुळे बेड कमी पडू लागले आहेत, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.