डॉक्टरांकडून आता प्रिस्क्रिप्शनवरच ऑक्सिजन सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:21 AM2021-04-27T04:21:19+5:302021-04-27T04:21:19+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात अजूनही ऑक्सिजनचा तुटवडा कायम आहे. ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात असला तरी रुग्णांना मात्र ऑक्सिजन बेड मिळत ...
अहमदनगर : जिल्ह्यात अजूनही ऑक्सिजनचा तुटवडा कायम आहे. ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात असला तरी रुग्णांना मात्र ऑक्सिजन बेड मिळत नसल्याची स्थिती आहे. ऑक्सिजन बेड मिळाला तर ऑक्सिजनची टंचाई असल्याने खासगी रुग्णालयातील डॉक्टर आता प्रिस्क्रिप्शनवरच ऑक्सिजन सिलिंडर लिहून देत आहेत. त्यामुळे रिकामी सिलिंडर घेऊन त्यात ऑक्सिजन कोठून भरून मिळणार, असा सवाल रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज ३ हजारांनी वाढत आहे. तेवढेच रुग्ण बरे होत असले तरी २३ हजार रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील ५० टक्क्यांच्यावर रुग्ण खासगी कोविड रुग्णालये, जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी १५ ते २० टक्के रुग्ण गंभीर असून त्यांना ऑक्सिजन बेडची गरज आहे. नव्याने रुग्ण दाखल होताना त्याला रुग्णालयात जागा मिळत नाही. त्यासाठी त्याला धावाधाव करावी लागते. ऑक्सिजन बेड मिळाले तर ऑक्सिजन नसल्याचे खासगी डॉक्टरांकडून सांगितले जाते. ऑक्सिजन नसल्याने खासगी डॉक्टर रुग्णांची जबाबदारी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर किती हवे आहेत, हे आता रुग्णांच्या नातेवाइकांना त्यांच्या चिठ्ठीवरच लिहून दिले जात आहे. चिठ्ठीसोबत रिकामे सिलिंडरही दिले जात आहेत. ते सिलिंडर कोठून भरून आणायचे, याबाबत कोणताही पत्ता त्यावर दिला जात नाही. त्यामुळे हे सिलिंडर कोठून भरून मिळतात, याची रुग्णांचे नातेवाईक चौकशी करीत आहेत.
--------------
जिल्ह्यात पुन्हा ऑक्सिजनची टंचाई
जिल्ह्यात पुन्हा एकदा ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा रुग्णालयात चारशेच्यावर कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून दोनशेपेक्षा जास्त जणांना तिथे ऑक्सिजनची गरज लागते आहे. जिल्ह्यासाठी रोज ६० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासते. त्यापैकी निम्माच ऑक्सिजन सध्या मिळत असल्याने ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आता खासगी डॉक्टरांनी थेट रुग्णांच्याच नातेवाइकांना ऑक्सिजन आणावा, अशी खासगी रुग्णालयांतील डॉक्टर मागणी करीत आहेत.
-------------
अशी आहे स्थिती
एकूण मागणी- ६० मेट्रिक टन
२५ एप्रिल रोजीचा पुरवठा- २० मेट्रिक टन
२६ एप्रिल रोजीचा पुरवठा -३५ मेट्रिक टन
-----------------
जिल्हा रुग्णालयात मिनिटाला ४०० लीटर निर्मिती
जिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प आता कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पातून दर मिनिटाला ४०० लीटर ऑक्सिजन तयार होतो. हा तयार झालेला ऑक्सिजन इतरत्र कुठेही दिला जात नाही. जिल्हा रुग्णालयात चारशेच्या वर रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागते. त्यामुळे बेडशी जोडलेल्या पाईपलाईनमध्येच हा ऑक्सिजन सोडला जातो. दरम्यान, हाही ऑक्सिजन कमी पडत असल्याने बाहेरून आणलेला आणखी १२ मेट्रिक टन ऑक्सिजनची दररोज मागणी केली जाते, असे जिल्हा रुग्णालयाच्या प्रकल्प प्रमुखांनी सांगितले.
--------------
सध्याची परिस्थिती गंभीर आहे. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. आम्हाला चिठ्ठी लिहून द्या, आम्हीच सिलिंडर घेऊन येतो, आम्हाला आमच्या रुग्णाचा जीव वाचवायचा आहे, असे नातेवाईक सांगतात. त्यामुळे डॉक्टरांचाही नाइलाज आहे. रुग्णांचे नातेवाईक घाबरलेले आहेत. ऑक्सिजन नसेल तर स्वत:च ते धावपळ करीत आहेत.
-डॉ. अनिल आठरे, अध्यक्ष, आयएमए