राहाता, कोपरगाव तालुक्यात ऑक्सिजनची आणीबाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:21 AM2021-04-27T04:21:15+5:302021-04-27T04:21:15+5:30
एकीकडे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने शिर्डी, राहाता व कोपरगावातील रुग्णालयांनी ऑक्सिजन आवश्यक असणारे पेशंट अॅडमिट ...
एकीकडे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने शिर्डी, राहाता व कोपरगावातील रुग्णालयांनी ऑक्सिजन आवश्यक असणारे पेशंट अॅडमिट करून घेणे थांबवले आहे, तर अन्य रुग्णांना इतरत्र हलवण्याच्या सूचना रुग्णालयांनी नातेवाइकांना दिल्या आहेत. ज्या रुग्णालयांकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत त्यांच्याकडे सौम्य व मध्यम ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे. मात्र, गंभीर रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिर्डी, कोपरगाव, राहाता येथे संगमनेर येथून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा होतो. कोपरगावला दोन सब एजन्सी असून त्यांना सिन्नर, संगमनेरमधून पुरवठा होतो. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून हा पुरवठा थांबवण्यात आला आहे. संगमनेर येथील रुग्णालयांनाही पुरेसा ऑक्सिजन मिळेनासा झाल्याने संगमनेरकरांनी ऑक्सिजन देणे थांबवले आहे. यामुळे कोपरगाव व राहाता तालुक्यातील रुग्णालयेच व्हेंटिलेटरवर गेली आहेत. यातील काही रुग्णालयांकडे सायंकाळपर्यंत तर काहींकडे रात्रीपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे.
प्रांताधिकार गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे हे ऑक्सिजन मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. पाठपुराव्यानंतर नगरवरून थोडे सिलिंडर मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
..................
ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संगमनेरच्या पुरवठादाराने नकार दिला आहे. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला आहे. ते ५० सिलिंडर देणार आहेत. काही दिवस रोज पुरवठा करण्याबाबत त्यांना विनंती केली आहे. पोकळे यांच्या प्लांटला लिक्विड मिळवण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
-गोविंद शिंदे, प्रांताधिकारी