पाच शहरांत ऑक्सिजन प्रकल्प उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:20 AM2021-04-25T04:20:31+5:302021-04-25T04:20:31+5:30
महसूलमंत्री थोरात यांनी शनिवारी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी थोरात म्हणाले, बाधित रुग्णांसाठी ...
महसूलमंत्री थोरात यांनी शनिवारी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी थोरात म्हणाले, बाधित रुग्णांसाठी होम क्वारंटाईन, होम आयसोलेशन पद्धतीचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. सर्व रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाईन केले पाहिजे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून लक्षणे असणाऱ्यांचे विलगीकरण करणे गरजेचे आहे. संगमनेरमध्ये या बाबीचा चांगला परिणाम दिसून आला. त्यामुळे बधितांची संख्या घटते आहे. बाधित रुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केल्यास केवळ औषधोपचारावर रुग्ण बरा होऊ शकतो. रुग्णांना ऑक्सिजन, इंजेक्शनची गरज पडत नाही.
जिल्हा नियोजन मंडळातून नगरचे जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कर्जत, पाथर्डी, संगमनेर व श्रीरामपूर येथे दररोज २५० जम्बो सिलिंडर क्षमतेचे ऑक्सिजन उत्पादन केंद्र उभारण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याला ऑक्सिजनचा अधिक पुरवठा होईल. जिल्हा नियोजन मंडळ, आमदार निधीतून १०० पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना पुरविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
--------
नगर शहरात मोठ्या आरोग्य केंद्राचा प्रस्ताव तयार करा
अहमदनगर महापालिका हद्दीत रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यादृष्टीने निर्बंध अधिक कडक करणे अत्यावश्यक आहे. कोविड केअर सेंटरमधील सुविधा वाढविण्यावर भर द्या. उपाययोजनांचा नियमित आढावा घ्यावा. जेथे मदत लागेल ते सांगा आम्ही मदत करू.
या संकटातून बोध घेऊन पुण्यातील ससून किंवा औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या धर्तीवर शहरात मोठे आरोग्य केंद्र उभारण्याच्या संदर्भाने अभ्यास करून जिल्हाधिकारी यांनी शासनास प्रस्ताव सादर करावा असे निर्देश थोरात यांनी दिले.
---
फोटो- २४ बाळासाहेब थोरात
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते.