पाचपुते यांचे ‘कमबॅक’चे संकेत

By Admin | Published: October 27, 2016 12:33 AM2016-10-27T00:33:02+5:302016-10-27T00:51:19+5:30

बाळासाहेब काकडे , श्रीगोंदा श्रीगोंदा बाजार समितीच्या तिरंगी लढतीत राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, आमदार राहुल जगताप गटाने १८ पैकी १० जागा जिंकून सत्तेत वर्चस्व

Pachpute's 'Comeback' sign | पाचपुते यांचे ‘कमबॅक’चे संकेत

पाचपुते यांचे ‘कमबॅक’चे संकेत


बाळासाहेब काकडे , श्रीगोंदा
श्रीगोंदा बाजार समितीच्या तिरंगी लढतीत राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, आमदार राहुल जगताप गटाने १८ पैकी १० जागा जिंकून सत्तेत वर्चस्व अबाधित ठेवले. माजी मंत्री बबनराव पाचपुते गटाने एकाकी झुंज देत ८ जागा जिंकून तालुक्याच्या राजकारणात ‘कमबॅक’चे संकेत दिले. निवडणुकीत ‘लक्ष्मी’ दर्शन व कास्ट फॅक्टरच्या झेंड्यांचे पडसाद मतपेटीत उमटले.
बाजार समिती सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी तालुक्यातील निरनिराळ्या निवडणुकींत नेहमी वेगळी भूमिका घेऊन सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांना जेरीस आणले होते. सर्वच पक्षांतील निरनिराळ्या पद्धतीने नाहाटा यांना चक्रव्यूहात अडकविण्यासाठी प्रयत्न झाला. नाहाटा यांनी अवघ्या ३४ मतांनी निवडणूक जिंकत चक्रव्यूह भेदला, मात्र मतदारांनी त्यांना जमिनीवर आणले. मात्र सभापतिपदाच्या निवडीत नाहाटा यांची हॅट्ट्रिक करण्यात कस लागणार आहे.
सोसायटी मतदार संघात ११ पैकी ९ जागा सत्ताधारी गटाने जिंकल्या, परंतु या गटात पाचपुते यांचे ओबीसी प्रवर्गातील उमेदवार वैभव पाचपुते यांनी सर्वाधिक १ हजार १७२ मते, तर लक्ष्मण नलगे यांनी १०७९ मते मिळवून करिष्मा दाखविला. पाचपुते यांना सोसायटी मतदार संघात जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रेय पानसरे यांची साथ मिळाली, ही वैभव पाचपुते यांची जमेची बाजू ठरली. सत्ताधारी गटाचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनसिंग भोयटे यांनी सोसायटी मतदार सर्वाधिक १०७९ मते मिळवून लोकप्रियता सिद्ध केली.
ग्रामपंचायत मतदार संघात सत्ताधारी गटाच्या मीना आढाव यांनी धक्कादायक विजय मिळविला, तर विरोधी गटाच्या सुजाता जाधव यांनी स्वतंत्र यंत्रणा राबवून बाजार समितीत ‘एंन्ट्री’ केली. भाऊसाहेब कोथिंबिरे यांनी हमाली मापाडी मतदार संघातून विजय संपादन केला. सतीश पोखर्णा यांनी चौथ्यांदा विजय संपादन केला. नाहाटा यांनी ‘हॅट्ट्रिक’ केली मात्र विद्यमान सदस्य देवा शेळके यांना पराभवाला सामोर जावे लागले.
विधानसभा निवडणुकीत राहुल जगताप यांना शिवाजीराव नागवडे, अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार, बाळासाहेब नाहाटा यांनी साथ दिली, परंतु त्यानंतर या नेत्यांमध्ये मतभेद झाले. बाजार समिती निवडणुकीत नागवडे, आ. जगताप यांनी पुन्हा मूठ बांधली, परंतु मतदारांची मूठ मात्र सैलच राहिली. दरम्यान, सत्तेत वर्चस्व कायम ठेवण्यात ते यशस्वी झाले. भविष्यात एकत्रित राजकारणाशिवाय पर्याय नाही, असा बोध या निवडणुकीतून मिळाला. बबनराव पाचपुते यांनी ऊसबिलाचा प्रश्न असतानाही त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन करीत कडवी झुंज दिली. घनश्याम शेलार यांनी तिसरा पॅनेल केला. त्यामुळे मतांची विभागणी झाली. यामध्ये मतदारांची दिवाळी मात्र गोड झाली.

Web Title: Pachpute's 'Comeback' sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.