पद्मश्री पोपटराव पवार हिवरेबाजारचे उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:20 AM2021-02-10T04:20:22+5:302021-02-10T04:20:22+5:30
अहमदनगर : आदर्श गाव हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे, तर उपसरपंचपदी पद्मश्री पोपटराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. हिवरेबाजार ग्रामपंचायतीची ...
अहमदनगर : आदर्श गाव हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे, तर उपसरपंचपदी पद्मश्री पोपटराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. हिवरेबाजार ग्रामपंचायतीची ३० वर्षांनंतर प्रथमच निवडणूक झाली होती. या निवडणुकीत पुन्हा पोपटराव पवार यांनी वर्चस्व सिध्द केले होते. दरम्यान, मंगळवारी (दि. ९) सरपंच, उपसरपंच निवडी झाल्या. यात पोपटराव पवार यांची उपसरपंचपदी निवड झाली.
वाळवणेत पती - पत्नी सरपंच - उपसरपंच
पारनेर तालुक्यातील वाळवणे गावच्या सरपंच, उपसरपंचपदी पती - पत्नीची निवड झाली आहे. सरपंचपद महिला राखीव असल्याने जयश्री सचिन पठारे यांची निवड करण्यात आली, तर उपसरपंचपदासाठी सचिन गुलाबराव पठारे यांना नवनिर्वाचित सदस्यांनी संधी दिली. दोन्ही पदासाठी या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
..
मोहा गावात सासू सरपंच-सून उपसरपंच
जामखेड तालुक्यातील मोहा ग्रामपंचायतीत सासूबाई सरपंच, तर सूनबाई उपसरपंच झाल्या आहेत. ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे.
सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारीका शिवाजी डोंगरे, तर उपसरपंचपदी स्वाती वामन डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मागील अडीच वर्षांपासून सरपंच म्हणून सारीका डोंगरे कारभार पाहात आहेत. सरपंच सासू, तर उपसरपंच सून आहे. तसेच या ग्रामपंचायतीमध्ये भीमराव कापसे व उजाबाई कापसे हे पती-पत्नी सदस्य म्हणून निवडून आले आहेत. मोहा ग्रामपंचायतीमध्ये प्रथमच महिलाराज आले आहे.
सुरेगावची सरपंचपदाची निवडणूक स्थगित
श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत सरपंचपद निवडीच्या वेळी बहुमत असलेल्या गटाचे पाच सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे गणसंख्येअभावी निवडीची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी एम. एन. बावस्कर यांना तहकूब करावी लागली.