पाडव्याला गृहप्रवेशाची ‘गुढी’ ; नगर जिल्ह्यात रिअल इस्टेटमध्ये चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 04:44 PM2018-03-16T16:44:24+5:302018-03-16T16:44:37+5:30
हिंदू नववर्ष व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नगर जिल्ह्यात गृहखरेदीचा कल वाढला आहे. गेल्या दोन वर्षांच्या मंदीनंतर रिअल इस्टेटमध्ये हळूहळू चैतन्य येत असून, यंदा मध्यमवर्गीयांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : हिंदू नववर्ष व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नगर जिल्ह्यात गृहखरेदीचा कल वाढला आहे. गेल्या दोन वर्षांच्या मंदीनंतर रिअल इस्टेटमध्ये हळूहळू चैतन्य येत असून, यंदा मध्यमवर्गीयांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
स्वत:चे घर असावे, ही प्रत्येकाचे इच्छा असते. त्यातही शहरात घर खरेदीचा आनंद वेगळाच असतो. ती फक्त राहण्याची सोय नाही, तर एक मोठी आर्थिक गुंतवणूक ठरते. त्यामुळे इतर स्थावर संपत्तीपेक्षा गृहखरेदीकडे प्रत्येकाचा ओढा असतो. मागील दोन वर्षांत रिअल इस्टेटमध्ये मंदीचे वातावरण आले. नोटाबंदी, रेरा कायदा, जीएसटी आदी कारणांमुळे व्यवहार ठप्प झाले. बाजारात चलन फिरत नसल्याने सर्वच घटकांवर कमी-अधिक प्रमाणात परिणाम झाला. परंतु मागील वर्षी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे ही मंदी काहीशी धुतली गेली. गेल्या सहा महिन्यांत बाजार पूर्वपदावर येत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले. त्यातही समाजातील सर्वच घटकांसाठी सध्या घर खरेदीला योग्य वातावरण आहे. घटलेला व्याजदर, सरकारी अनुदान, घरांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता अशा सर्वच बाजूंनी घर खरेदीचा मुहूर्त जुळून येत आहे. त्याचा पुरेपूर फायदा या गुढीपाडव्याला उचलला जातोय.
हिंदू नववर्ष व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला ग्राहक मोठी खरेदी करतात. त्यात घरखरेदीला प्रथम प्राध्यान्य दिले जाते. या पाडव्याला अनेकजण आपल्या नवीन घरीच गुढी उभारण्याच्या तयारीत आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी अनेक आॅफर दिल्याने त्याचाही फायदा उठवला जात आहे. मागील काही दिवसांत गृहकर्जाचे व्याजदर घटले आहेत. शिवाय पंतप्रधान आवास योजनेत गृहकर्जाला अडीच लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाते. बाजारात सध्या पाहिजे तशी घरे ‘रेडिपझेशन’मध्ये आहेत. त्यामुळे कामाचा दर्जा, लोकेशन, फायनान्स कंपन्यांकडे गृहकर्जाचे पर्याय अशा अनेक गोष्टींसाठी ग्राहकांना वेळ देता येत आहे. या सर्व सकारात्मक वातावरणामुळे यंदाच्या गुढीपाडव्याला मागील वर्षीपेक्षा २० टक्क््यांनी गृहखेरदीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खात्रीनेच गुंतवणूक करा
चांगल्या मुहूर्ताचा गैरफायदा घेण्यासाठी किंवा ग्राहकांना मोठ्या संख्येने आकर्षित करण्यासाठी विकासक अनेक आॅफर देतात. परंतु ग्राहकांनी सर्व गोष्टी तपासून, खात्री करून, तज्ज्ञांचा, वकिलांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. केवळ बुकिंगची घाई न करता कागदपत्रांची खातरजमा करूनच घर खरेदी करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या गृहखरेदीकडे सर्वसामान्यांचा कल आहे. १० ते २० लाखांपर्यंतची घरे पटापट विक्री होत आहेत. रो-हाऊसिंग, वन आर. के. ते वन बीएचकेला चांगली मागणी आहे. त्यातही पंतप्रधान आवास योजनेच्या सबसीडीचा फायदा होत असल्याने घरखेरदी वाढली असून, गेल्या दोन वर्षांतील मंदी पूर्वपदावर येत आहे. रिअल इस्टेटमध्ये गुढीपाडव्याला सर्वाधिक घर खरेदी नोंदवली जाते.
- राजेंद्र पाचे, बांधकाम व्यावसायिक