पाकिस्तानबरोबर युद्धच हवे - प्रवीण तोगडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 06:52 PM2018-02-10T18:52:13+5:302018-02-10T18:54:45+5:30
जम्मूतील मुफ्ती मेहेबुबा यांचे सरकार बरखास्त करावे व पाकिस्तानबरोबर युद्ध करावे, असे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पत्रकारांशी बोलताना सूचित केले.
नेवासा : भारतीय सीमेवर झालेल्या पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याला रोहिंगिया मुसलमान जबाबदार असून, या मुस्लिमांना देशातून हाकलून जम्मूतील मुफ्ती मेहेबुबा यांचे सरकार बरखास्त करावे व पाकिस्तानबरोबर युद्ध करावे, असे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पत्रकारांशी बोलताना सूचित केले.
नेवासा तालुका दौ-यावर असलेले डॉ. तोगडिया यांनी शनिवारी सुरुवातीला शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन घेऊन अभिषेक केला. यावेळी देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री क्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांनी तोगडिया यांचे स्वागत केले. त्यानंतर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तोगडिया यांचा सत्कार केला.
देवगड येथे पत्रकारांशी बोलताना तोगडिया म्हणाले, भारतीय सीमेवर आर्मी कॅन्टोन्मेंटवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये दोन भारतीय सैनिक ठार झाले. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्या आजूबाजूस रोहिंग्या मुसलमान राहतात. त्यामुळे हा हल्ला याच मुस्लिमांच्या सहकार्याने झालेला आहे. विश्व हिंदू परिषद काँग्रेसच्या सरकारपासून रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हकलावे, अशी मागणी करत आहे. या हल्ल्याचे स्वरूप पाहता पाकिस्तानशी युद्ध पुकारायला हवे. किती दिवस भेट, बोलणे चालणे चालणार आहे. आता फक्त युद्ध महत्त्वाचे आहे. आपल्याला अरब आणि पाकिस्तानशी गळाभेट करायची नाही. बंदुकीने उत्तर देण्याची गरज आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे भारतीय सीमेवर सैनिक मरत आहेत. ज्या देशात सैनिकांवर दगडफेक करणारांवरील खटले मागे घेतले जातात आणि जे सैनिक स्वत:चा बचाव करण्यासाठी गोळी चालवतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. यामुळे सैनिकांची हिंमत कमी होणार आहे. जम्मूमधील मुफ्ती मेहबुबा यांचे सरकार बरखास्त करून पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची गरज आहे.
तोगडिया म्हणाले, देशातील निम्म्याहून अधिक शेतक-यांवर कर्ज आहे. शेतक-यांच्या मालाला भाव नाही. उत्पादनखर्चाच्या दीडपट मूल्य शेतक-यांच्या मालाला मिळाला पाहिजे. कपाशी चार हजार रुपये भाव आणि उत्पादनखर्च सहा हजार रुपये असेल, तर शेतकरी आत्महत्या करणारच. आजपर्यंत सर्वच सरकारचे शेतीविषयीचे चुकीचे धोरण असल्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालास भाव मिळाल्यास कर्जबाजारी न होता आत्महत्या थांबतील. शिवाय सरकारला कर्ज उपलब्ध शेतकरी करून देतील. याबाबत जनजागृती करण्यासाठी मी लवकरच अभियान सुरू करणार आहे. आयात व निर्यातीवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय विश्वस्त शिवाजी शेरकर, प्रदेशाध्यक्ष संजय बारगजे, बजरंग दल प्रदेश संयोजक सुनील चावरे, बाळू महाराज कानडे, संदीप साबळे उपस्थित होते.
दरम्यान, देवगडजवळील जळका शिवारात तोगडिया यांनी शिवारफेरी मारली. त्यानंतर औरंगाबादला जाताना टोका येथील श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिराला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गोदावरी तीरावर पुष्प व श्रीफळ अर्पण करून गंगापूजन केले. सिद्धेश्वर देवस्थानचे प्रमुख महंत बालब्रम्हचारी महाराज यांनी देवस्थानच्या वतीने तोगडिया यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन दिनकर, हिंदू हेल्प लाइनचे हेमंत त्रिवेदी, आप्पा बारगळ, रमेश गंगुले, भय्या कावरे, रमेश राजगिरे, प्रशांत बहिरट, गजानन गवारे आदी उपस्थित होते.
राममंदिर प्रश्नावर बगल
राममंदिर प्रश्न चर्चेतून सुटू शकतो का? असे विचारले असता तोगडिया म्हणाले, कोणते आपण दिवास्वप्न बघतो आहे. कित्येक वर्षांपासून दाढी, टोपीवाले यांनी ऐकले नाही आणि गांधी यांनी देशाचे तुकडे करूनही ते त्यांना समजावू शकले नाहीत. आता देशात कोणता असा नवीन गांधी जन्माला येतो आहे असे सांगून राममंदिर प्रश्नावर प्रवीण तोगडिया यांनी बगल दिली.