पारनेर तालुक्यातील तिर्थक्षेत्रे होणार चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 05:24 PM2018-07-04T17:24:28+5:302018-07-04T17:25:56+5:30
पारनेर तालुक्यातील गोरेगाव, जातेगाव,रायतळे व अपधुपसह सात गावच्या तिर्थक्षेत्रांचा परिसर चकाचक होणार आहे.
सुपा : पारनेर तालुक्यातील गोरेगाव, जातेगाव,रायतळे व अपधुपसह सात गावच्या तिर्थक्षेत्रांचा परिसर चकाचक होणार आहे. सुशोभीकरण व विकासासाठी ८० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून लवकरच कामे सुरू होणार असल्याचे पारनेर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. टी. कांबळे यांनी सांगितले.
गेल्या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या निधींद्वारे तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. परंतु नंतर विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे प्रक्रिया थांबली होती. आता लवकरच प्राप्त निविदा मंजूर करून त्या त्या ठिकाणची विकास कामे सुरू होतील, असेही कांबळे यांनी सांगितले. नगर पुणे रस्त्यालगत असणाºया जातेगावच्या सुप्रसिद्ध भैरवनाथ देवस्थानसाठी पोहच रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी १० लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे. तालुक्यातील दरोडी देवस्थान विकासात तेथे पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वाधिक २० लाख रूपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रायतळे येथील सद्गुरू शांतानंद आश्रमात शौचालय सुविधेसाठी १० लाख रूपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. गोरेगाव,पळशी,अपधुप व चिंचोली येथील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवून तो परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी १० लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे.
एका तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी वर्षाला ३० लाख रूपयांपर्यंत निधीची कामे करता येत असल्याचे कांबळे यांनी सांगितले. वाघुंडे येथील श्री दत्त देवस्थान व वाळवणे येथील श्री भैरवनाथ देवस्थनचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश आहे. या दोन्ही तिर्थक्षेत्रांना गेल्यावर्षी निधी मिळाला नाही. दोन्ही ठिकाणांचा विकास आराखडा तयार केल्याचे वाळवणे येथील भैरवनाथ देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष सचिन पठारे व वाघुंडेचे सरपंच संदीप मगर यांनी सांगितले. सर्व प्रस्तावांची पूर्तता करूनही निधी मात्र मिळाला नसल्याने या दोन्ही गावातील ग्रामस्थ व भाविकांनी नाराजी व्यक्त करीत आगामी आर्थिक वर्षात तरी निधी मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
पारनेर तालुक्यातील मंजूर झालेल्या सात गावांच्या तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांची निविदा प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण होऊन लवकरच कामास सुरूवात होईल.
-आर. टी. कांबळे, शाखा अभियंता, बांधकाम विभाग, पंचायत समिती,पारनेर.