अवकाळी, गारपीट; नुकसानीचे पंचनामे होणार, संगमनेरच्या तहलसीलदारांची माहिती
By शेखर पानसरे | Published: March 18, 2023 10:11 PM2023-03-18T22:11:46+5:302023-03-18T22:15:01+5:30
संगमनेरात तालुका, तलाठी, कृषी सहायकांना केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
संगमनेर: अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे संगमनेर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. असे असले तरीही सदरचा विषय संवेदनशील असल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात तलाठी आणि कृषी सहायक यांना आवाहन केले होते, त्यासाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. असे संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.
शनिवारी (दि. १८) संगमनेर तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यात शेतीचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेल्या पिकांना तसेच टोमॅटो पिकाला मोठा फटका बसला. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी १४ मार्चपासून शासकीय कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कामे खोळंबली आहेत. असे असताना अवकाळी पाऊस आणि गारपीट याचा फटका संगमनेर तालुक्याला देखील बसला. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात तलाठी व कृषी सहायक यांना सदरचा विषय संवेदनशील असल्यामुळे सर्वांनी सक्रियपणे पंचनामे पूर्ण करावेत, असे आवाहन केले होते. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. इतर कामांच्या बाबतीत त्यांचा संप सुरु राहणार आहे.