मिडसांगवीत ५२ कोंबड्या दगावल्याने घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:50 AM2021-01-13T04:50:42+5:302021-01-13T04:50:42+5:30

मिडसांगवी येथे सहादू युसूफ शेख, दिलावर बादशहा शेख, शफीक चंदूभाई शेख, जावेद युसूफ शेख व सलीम दादाभाई शेख या ...

Panic over scattering of 52 hens in Midsangvi | मिडसांगवीत ५२ कोंबड्या दगावल्याने घबराट

मिडसांगवीत ५२ कोंबड्या दगावल्याने घबराट

मिडसांगवी येथे सहादू युसूफ शेख, दिलावर बादशहा शेख, शफीक चंदूभाई शेख, जावेद युसूफ शेख व सलीम दादाभाई शेख या पशुपालकांनी खुल्या पद्धतीने कुक्कुटपालन केले असून, गेल्या दोन दिवसांत त्यांच्याकडील ५२ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. त्यामुळे सोमवारी पाथर्डीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जगदीश पालवे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. काही मृत कोंबड्या ताब्यात घेऊन त्या उत्तरीय तपासणीसाठी अहमदनगर येथे व नंतर भोपाळ येथील केंद्रीय तपासणी केंद्रात पाठविल्या जाणार आहेत. तपासणीअंती कोंबड्या दगावण्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती डॉ. पालवे यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूची नोंद झाली नसली तरी इतर जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या घटना आढळल्याने जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ७८ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यासंदर्भात सोमवारी पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभागाची बैठक घेतली. उपवन संरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंभारे, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बी. एन. शेळके, पशुसर्वचिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यावेळी उपस्थित होते.

....................

जिल्ह्यात १ कोटी १४ लाख कोंबड्या

सध्या जिल्ह्यात ३ हजार ३४१ पोल्ट्री फार्मस् असून, त्यात १ कोटी १४ लाख पक्षी आहेत. पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाची लक्षणे आढळल्‍यास पशुपालकांनी नजीकच्‍या पशुवैद्यकीय दवाखान्‍याशी संपर्क साधावा. रोजची स्‍वच्‍छता व निर्जंतुकीकरण करावे. स्थलांतरित पक्षी ज्‍या भागात येतात, त्‍या भागामध्‍ये व्‍यापक सर्वेक्षण मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले आहेत.

-----------

श्रीगोंद्यात कबूतर, कावळ्याचा मृत्यू

पाथर्डी तालुक्यात ५२ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्यानंतर सोमवारीच श्रीगोंदे शहरात एक कबूतर, तर भानगाव (ता. श्रीगोंदा) येथे एका कावळ्याचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाने या पक्ष्यांचे नमुने ताब्यात घेतले असून, ते उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सुनील तुंभारे यांनी दिली.

------------

काही दिवसांपूर्वी आकाशात पृथ्वीच्या पृ्ष्ठभागावर धुमकेतू आदळल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकषर्णाने त्याचे तुकडे झाले. त्यामुळे वातावरणात बदल झाला असून, त्याचा परिणाम पृथ्वीवरील जीव, प्राणीमात्रांवरही होत आहे. त्यातूनही पक्षी किंवा जनावरे दगावण्याचे प्रकार होत असण्याची शक्यता आहे.

- सुधाकर केदारी, भूगर्भ अभ्यासक

Web Title: Panic over scattering of 52 hens in Midsangvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.