राहुरी तालुक्यात बिबट्याची दहशत; उस तोडणी मजुरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:24 PM2017-11-06T16:24:06+5:302017-11-06T16:30:14+5:30
ब्राम्हणी येथे सोमवारी देशमुख यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु असताना अचानक बिबट्याने ऊस तोडणी मजूर तुकाराम सोनवणे यांच्यावर झडप घातली. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांमध्ये एकच आरडाओरडा झाला. त्यामुळे घाबरुन बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोमली.
ब्राम्हणी : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे बिबट्याने थेट ऊस तोडणी मजुरावर हल्ला चढविल्याने तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत पसरली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी काम बंद आंदोलन केले.
सध्या कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे उसाची तोडणी करण्यासाठी विविध जिल्ह्यातून टोळ्या राहुरी तालुक्यात दाखल झाल्या आहेत. ब्राम्हणी येथे सोमवारी देशमुख यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु असताना अचानक बिबट्याने ऊस तोडणी मजूर तुकाराम सोनवणे यांच्यावर झडप घातली. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांमध्ये एकच आरडाओरडा झाला. त्यामुळे घाबरुन बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोमली.
जखमी अवस्थेत सोनवणे यांना नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. बिबट्याच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या ऊस तोडणी मजुरांनी उसाची तोड थांबविली. ब्राम्हणी येथील शेतक-यांनी वनखात्याला मोबाईलव्दारे माहिती दिली. मात्र, वनविभागाने प्रतिसाद दिला नाही. दरम्यान गणेश भगत या शेतक-याच्या शेतातही बिबट्या आढळून आला.
राहुरी तालुक्यात उसाच्या पट्ट्यात बिबट्याचे आश्रयस्थान आहे. मुळा व प्रवरा पट्ट्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. अनेक शेळ्या, कालवडी बिबट्याने फस्त केल्या आहेत. सध्या उसाच्या तोडी सुरू असल्याने बिबट्याचे स्थलांतर सुरू झाले आहे.
ब्राम्हणी येथे रविवारी बिबट्याची तीन पिल्ले उस तोडणा-या मजुरांना आढळून आली. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी संदीप देशमुख व गणेश भगत यांनी केली आहे.