मजुरांना दरवाढ न मिळाल्यास कोयता बंदच :पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:51 PM2018-10-02T12:51:49+5:302018-10-02T12:51:54+5:30
दसऱ्यापूर्वी ऊसतोडणी कामगारांसाठी महामंडळ अस्तित्वात येऊन मजुरांना भाववाढ दिली जाईल, अन्यथा कोयता बंद आंदोलन केले जाईल.
पाथर्डी : दसऱ्यापूर्वी ऊसतोडणी कामगारांसाठी महामंडळ अस्तित्वात येऊन मजुरांना भाववाढ दिली जाईल, अन्यथा कोयता बंद आंदोलन केले जाईल. ऊसतोडणी कामगारांसाठी दस-यापूर्वी महामंडळ अस्तित्वात येण्यासाठी ऊसतोडणी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ऊसतोडणी कामगारांना आरोग्य, शिक्षण, कर्ज, विमा, घर मिळाले पाहिजे. यासाठी कामगारमंत्र्यांना आदेश द्या, असे सांगितल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी खरवंडी कासार येथील ऊसतोडणी कामगार मेळाव्यात स्पष्ट केले.
आमदार मोनिका राजळे अध्यक्षस्थानी होत्या. मुंडे म्हणाल्या, मजुरांचा दरवाढीसंदर्भात पाच वर्षांचा करार कधीच झाला नव्हता. मात्र ज्यावेळी पाच वर्षांचा करार केला, त्यावेळी साखरेचा दर प्रति क्विंटल १९०० रूपयांपर्यंत कोसळल्याने कारखानदारी अडचणीत होती. आपला ऊस तोडणी कामगार कर्नाटककडे स्थलांतरित होत होता. साखर कारखाने टिकावेत, म्हणून पाच वर्षांचा करार करण्यात आला. मात्र त्यावेळी साखरेला भाव वाढल्यावर मजुरांची देखील मजुरी वाढवावी लागेल, असा आग्रह धरला होता. त्यामुळे साखरेला भाववाढ झाल्याने मजुरीही वाढली पाहिजे. त्यासाठी दोन दिवसानंतर लवादाची बैठक होणार आहे. मजुरी दरवाढीचा निर्णय झाला नाही तर कोयता बंद आंदोलन केले जाईल.
खासदार दिलीप गांधी, प्रितम मुंडे, आमदार भीमराव धोंडे, सुरेश धस, माजी आमदार गोविंद केंद्रे, केशव आंधळे, विजय गोल्हार, पंचायत समिती सभापती चंद्रकला खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाठ, सोमनाथ खेडकर, रामराव खेडकर, मोहनराव पालवे, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे,राहुल कारखेले, गोपीनाथ मुंडे ऊसतोड मुकादम वाहतूक संघटनेचे पिराजी किर्तने, अशोक खरमाटे, आलमगीर पठाण, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, संजय किर्तने, अशोक चोरमले,धनंजय बडे, अरूण मुंडे, बाळासाहेब ढाकणे, बापूसाहेब पाटेकर, शेवगाव उपनगराध्यक्ष वजीर पठाण,काशीबाई गोल्हार,सुरेखा ढाकणे,मनीषा घुले आदी उपस्थित होते.
मुंडे यांचा ऊसतोड मजूर संघटनेतर्फे उसाची मोळी व कोयता भेट देऊन सत्कार करण्यात आला. करोडी येथील विनाअनुदानित भारतमाता प्रतिष्ठानच्या आश्रमशाळेला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे मुंडे यांच्या हस्ते एक लाखाची देणगी दिली. एक वाजेची सभा चार वाजता सुरू होऊनही मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार, मुकादम, महिला मोठ्या संख्येनेउपस्थितहोते. संपत किर्तने यांनी प्रास्तविक केले. राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. संजय कीर्तने यांनी आभार मानले.