नदीजोड प्रकल्प पूर्ण करणार : पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 07:21 PM2019-04-24T19:21:54+5:302019-04-24T19:22:58+5:30
जनतेला अडाणी ठेवत काँग्रेस सरकारने खा-खा खाल्ले. आमची पाच वर्षे त्यांची खरकटे काढण्यात गेली.
नेवासा : जनतेला अडाणी ठेवत काँग्रेस सरकारने खा-खा खाल्ले. आमची पाच वर्षे त्यांची खरकटे काढण्यात गेली. आता नदीजोड प्रकल्पासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करून देशातील शेतकरी सुखी करणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नेवासा फाटा येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, युवामोर्चाचे सचिन तांबे, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, युवासेनेचे नीरज नांगरे, शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिन्द्र म्हस्के, हरिभाऊ शेळके, नितीन जगताप, पूजा लष्करे उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या,सर्जिकल स्ट्राईक हा निवडणुकीचा विषय नसून या राजवटीत मिळणारे संरक्षण हा महत्वाचा विषय आहे. ग्रामविकास खात्यांतर्गत प्रत्येक माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक अंगाशी निगडित काम करण्याचा अनुभव मिळाला. या खात्यांतर्गत विकास निधीचा पासून राज्यात पडला. जलसंवर्धन, आरोग्य, घरकुल, रस्ते यामध्ये मोठे काम उभे केले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देखील या परिसरात दोनशे बारा कोटींचा निधी दिला त्याचे वाटप करताना कोणताही भेदभाव केला नसल्याने सर्व भागाचा विकास झाला आहे. राज्यात घरकुल वाटपाचे काम एवढे चांगले झाले की केंद्राने १० लाख घरे राज्यासाठी पुन्हा मंजूर केली असल्याने बेघर मुक्त महाराष्ट्र योजना आपण पूर्ण करत आहोत. मोदी सरकार काळात स्वच्छता अभियान, जनधन योजना या सारख्या योजनांमुळे दलाल संपले आहे. सध्या विरोधकांच्या महाखिचडीचा नेता कोण आहे हे त्यांनाच येत नाही पण आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थिर व मजबूत सरकार देणारे ठरले आहेत. खासदार लोखंडे हे गवगवा न करता काम करणारे नेते आहेत त्यांच्या कामाची पद्धत चांगली आहे.
लोखंडे म्हणाले, माझी ही नववी निवडणूक असून मागील पाच वर्षांमध्ये निळवंडे च्या चारीचा मोठा प्रश्न मार्गी लावला आहे.प् ाुढील पाच वर्षात मतदार संघात पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.