शेलार-नाहाटांच्या वादात पानसरेंची उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:23 AM2021-05-27T04:23:29+5:302021-05-27T04:23:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीगोंदा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार व बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या ...

Pansare jumps into the Shelar-Nahat dispute | शेलार-नाहाटांच्या वादात पानसरेंची उडी

शेलार-नाहाटांच्या वादात पानसरेंची उडी

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीगोंदा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार व बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या सोशल मीडियावरील आरोप-प्रत्यारोपांच्या वादात जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांनी उडी घेतली आहे. पानसरे यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये शेलार यांना पाठिंबा दिला तर नाहाटांना विरोध दर्शविला आहे. त्यामुळे पानसरे-नाहाटा ही जोडी आगामी काळात आमने-सामने येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बाळासाहेब नाहाटा व दत्तात्रय पानसरे यांची मैत्री श्रीगोंदा तालुक्याला परिचित आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत दत्तात्रय पानसरेंच्या विरोधात नाहाटांनी छुपी खेळी केली. तेव्हापासून या मैत्रीत मिठाचा खडा पडला आहे. कुकडीच्या पाणीप्रश्नी आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर घनश्याम शेलार यांनी निशाणा साधला. त्यावर भाजप नेत्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यावेळी पाचपुते विरोधक असलेले बाळासाहेब नाहाटा यांनी शेलारांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे शेलार-नाहाटा यांच्यात जुंपली. ही लढाई सोशल मीडियावर गेली. येथे शेलारांना पाठराखण करणारा नवा मित्र मिळाला.

आता दत्तात्रय पानसरे यांनी शेलार समर्थक अजित जकाते यांची नाहाटांच्या विरोधातील पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी नाहाटांना चिमटा घेतला. पानसरे हे आगामी काळात जिल्हा बँक निवडणुकीतील डावपेचांचा वचपा काढणार, याचे संकेत यामधून मिळू लागले आहेत. आता बाळासाहेब नाहाटा काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे.

----

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत विश्वासघातकी राजकारण अनुभवले आहे. सध्या अशा घाणेरड्या राजकारणात भाग घ्यायचा नाही. मात्र, वेळ आली की अशा आत्मघातकी प्रवृत्तींना दूर करण्यासाठी अस्त्र वापरणार आहे.

- दत्तात्रय पानसरे,

माजी संचालक, जिल्हा बँक

Web Title: Pansare jumps into the Shelar-Nahat dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.