चन्या बेगचे श्रीरामपुरातील पंटर भूमिगत; पोलीस मागावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 10:07 AM2017-10-17T10:07:46+5:302017-10-17T13:42:25+5:30
बेग टोळीचा मोहरक्या चन्या बेग व त्याचा भाऊ टिप्या बेग या दोघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असून या टोळीला आर्थिक मदत करणारे, तसेच त्यांच्याशी संधान असणा-यांची नावे पुढे आली आहेत.
श्रीरामपूर : खून, मारामा-या, लूटमार, खंडणी अशा विविध गुन्ह्यात नाशिक, नगर, पुणे, मुंबई पोलिसांच्या रडारवर असलेल्या चन्या बेगला नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर पोलीस आता चन्या बेगच्या श्रीरामपुरातील पंटरांच्या शोधात आहेत. त्यामुळे चन्या बेगच्या टोळीतील श्रीरामपूर येथील पंटर गायब झाल्याची चर्चा श्रीरामपूरच्या चौकाचौकात दबक्या आवाजात सुरु आहे.
बेग टोळीचा मोहरक्या चन्या बेग व त्याचा भाऊ टिप्या बेग या दोघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असून या टोळीला आर्थिक मदत करणारे, तसेच त्यांच्याशी संधान असणा-यांची नावे पुढे आली आहेत. श्रीरामपूर, राहुरी तालुक्यांतील अनेकजण पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे अनेकजण भूमिगत झाले आहेत.
श्रीरामपूरमध्ये या टोळीचा अड्डा असल्याने पोलिसांनी याठिकाणी लक्ष केंद्रित करून प्रदीप सानप, लखन सानप यांना अटक केली. तसेच इतर दोघा राजकीय नेत्यांचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील ग्रामपंचायतीचा माजी पदाधिकारी, तसेच एका संघटनेचा जिल्हाध्यक्ष असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील पदाधिका-याचे नाव अग्रेसर आहे. त्यांच्या व्यतिरिक्त आणखी १५ ते २० जणांची चौकशी होणार आहे. या टोळीला रसद पुरविणारे कोण-कोण आहेत? याची माहिती पोलिसांनी जमविली आहे. त्यामुळे आता अटक होण्यात कोणाचा नंबर लागतो? याकडे श्रीरामपूरकरांचे लक्ष आहे.