कागदावर वाढविले उत्पन्न दुप्पट, शंभर टक्के निधी संपविला पटापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:54+5:302021-07-07T04:25:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : यंदाच्या अर्थसंकल्पात चटईक्षेत्र, रेखांकन आणि अंतर्गत विकास भाराच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करून अप्रत्यक्षरीत्या शंभर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : यंदाच्या अर्थसंकल्पात चटईक्षेत्र, रेखांकन आणि अंतर्गत विकास भाराच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करून अप्रत्यक्षरीत्या शंभर टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे नूतन पदाधिकाऱ्यांना रोख स्वरुपातील मिळणारा निधी शिल्लकच राहिलेला नाही. पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर प्रशासनाने निधी वितरित केला तरी बिलांसाठी ज्येष्ठता यादीचा निकष लावला जाणार आहे. त्यामुळे रोखीतील कामांच्या बिलांसाठीही आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महापालिकेला कर वसुलीतून सर्वाधिक उत्पन्न मिळते. मनपाच्या उत्पन्नाचा हा मुख्य स्रोत आहे; पण कराची वसुली वेळेवर होत नाही. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. पदाधिकारी व नगरसेवक स्वेच्छा निधीतून केलेल्या कामांची बिले वर्षानुवर्षे मिळत नाहीत. नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतील कामांचे सुमारे एक कोटी रुपये मनपाकडे थकले आहेत. याशिवाय मागील ४० कोटी ठेकेदारांना देणे आहे. मनपाच्या रोख स्वरूपातील निधीतून प्रस्तावित कामांवर मात्र ठेकेदारांच्या उड्या पडतात. कारण या कामांची बिलेही वेळेत मिळतात. या निधीतून प्रस्तावित कामे नगरसेवकांकडून केली जातात. मात्र, नगरसेवकांपर्यंत हा निधी पोहोचत नाही. पदाधिकाऱ्यांकडून रोख निधीतून कामे सुचविली जातात. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपला. रोख निधीतील ३० टक्के रक्कम एप्रिलमध्ये वितरित करण्यात आली होती. त्यानंतर कार्यकाळ संपत असल्याने माजी महापौरांसह नगरसेवकांनी रोख निधीतील आणखी २० टक्के निधी वितरित करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. वास्तविक पाहता गेल्या तीन वर्षांपासून रेखांकन, चटईक्षेत्र आणि अंतर्गत विकास भारातून महापालिकेला सुमारे ५ ते ६ कोटींचे उत्पन्न मिळते. असे असताना चालू वर्षातील अंदाजपत्रकात ११ कोटी २५ लाखांची तरतूद केली गेली. त्याच्या ५० टक्के म्हणजे ५ कोटींचा निधी माजी महापौरांनी खर्ची पाडला असून, नूतन पदाधिकाऱ्यांना निधीच शिल्लक राहिलेला नाही.
.....
तरतूद वाढवून संपविला निधी
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने शंभर टक्के निधी वितरित केला जात नाही. यापूर्वी तर ५० टक्केच निधी वितरित केला गेला होता. त्यामुळे पदाधिकारी तरतुदींमध्ये वाढ करतात. माजी महापौर वाकळे यांनी रोख स्वरूपातील निधीत दुपटीने वाढ करून शंभर टक्के निधी संपविला आहे.