पंचायत राज कमिटीच्या स्वागतासाठी श्रीगोंद्यात अवतरला स्वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 04:22 PM2018-10-05T16:22:28+5:302018-10-05T16:27:26+5:30
जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती तसेच गावागावांतील कामांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात काल पंचायत राज समिती दाखल झाली.
श्रीगोंदा : जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती तसेच गावागावांतील कामांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात काल पंचायत राज समिती दाखल झाली. पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेतील अधिका-यांची खरडपट्टी केल्यानंतर आज दुस-या दिवशी आज पंचायत राज समिती श्रीगोंदा पंचायत समितीत दाखल झाली. आपल्या कारभारावर ताशेरे न ओढण्यासाठी श्रीगोंदा पंचायत समिती प्रशासनाने कमिटीच्या स्वागतासाठी चक्क स्वर्गच निर्माण केला होता. यामुळे कमिटीमधील सदस्यांना स्वर्गात आल्याचा क्षणभर भास झाला.
श्रीगोंदा पंचायत समितीमधील अधिका-यांनी आपल्या हलगर्जीपणाच्या कारभारावर पडदा टाकण्यासाठी समितीच्या स्वागताला बंगलोरचा फुलोत्सव, दिल्लीचे रुम फ्रेशनेर, मलमली गालीचे, खाण्यासाठी मुंबईचा सुकामेवा अन भोजनासाठी उस्मानाबादी बोकडाचे मटन असा पंचतारांकित बेत ठेवला होता. आगमनाचे स्वागत करण्यासाठी पंचायत समिती प्रवेशद्वारापासून गुलाबी रंगाचा गालीचा अंथरला होता. रंगीबेरंगी झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. कमिटीचे मधुर शहनाई वादनाने स्वागत करण्यात आले. प्रत्येक सदस्याला ५०० रूपयांचा गोल्डन पेन देण्यात आला. हा शाही थाट पाहून सदस्यांना स्वर्गात आल्याचा भास झाला. समितीमधील सदस्यही या थाटामुळे गडबडले अन दोन मिनिटे ते बसलेही नाहीत.
पंचायत समितीने स्वागतासाठी लाखोंची उधळपट्टी केली पण सदस्यांनी अवघ्या ३० मिनीटात आढावा घेतला. समिती मात्र उस्मानाबादी बोकडाच्या मटनाचा आस्वाद न घेताच हिरडगावकडे निघून गेली.
फुलांकडे पाहून अहवाल देणार नाही
दुष्काळाचे सावट, हुमणी सारख्या किडीच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, पण श्रीगोंदा पंचायत समितीनेलाखो रुपये खर्च करून केलेला पाहुचार योग्य वाटला का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच कमिटीच्या सदस्यांनी पाहुण्यांचे स्वागत कसे करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही तर जालन्यात चहाही पिलो नाही. श्रीगोंद्यात शाही स्वागत झाले झाले असल तरी आम्ही अहवाल फुलांकडे पाहून देणार नाही, असे पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी सांगितले.