पालकांची पसंती जिल्हा परिषद शाळांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:00 PM2018-06-21T13:00:54+5:302018-06-21T13:00:59+5:30
खासगी शैक्षणिक संस्थांचे पेव फुटले असले तरी पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांनाच प्राधान्य दिले आहे. पहिल्या चार दिवसांतच जिल्हा परिषदेच्या शाळेत नवीन तीस हजार मुले दाखल झाले आहेत.
अहमदनगर : खासगी शैक्षणिक संस्थांचे पेव फुटले असले तरी पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांनाच प्राधान्य दिले आहे. पहिल्या चार दिवसांतच जिल्हा परिषदेच्या शाळेत नवीन तीस हजार मुले दाखल झाले आहेत. पुढील आठवड्यात पटसंख्या आणखी वाढेल, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
उन्हाळी सुटीत दाखलपात्र मुलांचे दरवर्षी सर्वेक्षण होत असते़ परंतु, जिल्हा परिषदेच्या सर्व गुरुजींना बदल्यांचे वेध लागले होते. त्यामुळे पालक भेटी झाल्या नाहीत. त्यामुळे यंदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या पटसंख्येत घट होईल, असा अंदाज शिक्षण विभागाने बांधला होता. मात्र शहरासह जिल्ह्यातील पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करत शिक्षण विभागाचा अंदाज मोडीत काढला. जिल्हा परिषदेच्या शाळा शुक्रवारी सुरू झाल्या़ बुधवारी शाळेचा चौथा दिवस होता़ पहिलीच्या वर्गात गेल्या चार दिवसांत नव्याने दाखल झालेल्या मुलांची आकडेवारी शाळांकडून प्राप्त झाली आहे.
खासगी शाळांची विद्यार्थी मिळविण्यासाठी धावपळ
पहिलीच्या वर्गात ३० हजार ९६७ नवीन मुले दाखल झाली आहेत़ जिल्ह्यातील दाखल पात्र मुलांची आकडेवारी पाहता जिल्हा परिषदेच्या शाळाच सरस ठरल्या आहेत़ शहरी व ग्रामीण भागांतील पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना प्राधान्य दिल्याने खासगी शाळांना मुले मिळविण्यासाठी धावपळ करावी लागली़ शहरात ४ हजार ८०० दाखल मुलांपैकी ४ हजार ५०० मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे़
राहुरीत साडेनऊशे मुले
जिल्ह्यातील दाखल पात्र मुलांची यादी शाळांनी जाहीर केली आहे़ जिल्ह्यात ३१ मे २०१८ रोजी सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांची संख्या ४५ हजार ४६९ ऐवढी आहे़ त्यापैकी ३० हजार मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळेची वाट धरली आहे़ राहुरी तालुक्यातील २ हजार २१८ दाखल पात्र मुलांपैकी अवघी साडेनऊशे मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली आहेत़
७० टक्के मुले जि़ प़ शाळेत
संगमनेर व नेवासा तालुक्यांत सर्वाधिक चार हजारांहून अधिक दाखल पात्र मुले आहेत़ त्यापैकी संगमनेर तालुक्यातील ३ हजार, तर नेवासा तालुक्यातील ७० टक्के मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला पसंती दिली आहे़
शहरातील तीनशे मुले खासगी शाळेत?
नगर शहरात दाखल पात्र मुलांचे सर्वेक्षण महापालिकेच्या शिक्षण मंडळाने केले़ यानुसार नगर शहरात ४ हजार ५०० मुलांना ३१ मे २०१८ रोजी सहा वर्षे पूर्ण झालेली आहेत़ त्यापैकी ४ हजार ५०० मुले पालिकेच्या शाळेत दाखल झाल्याचा दावा शिक्षण मंडळाने केला आहे़ याचा अर्थ शहरातील ३०० मुलेच खासगी शाळेत दाखल झाले असा होतो़ पालिकेच्या अहवालाने शिक्षण विभागासह सर्वच अवाक् झाले़
मुले मिळविण्यासाठी ग्रामीण भागात सुरू असलेल्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळांनी बाजी मारली आहे़ जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिलीच्या वर्गात दाखल मुलांची तालुकानिहाय संख्या पुढीप्रमाणे-
अकोले- १ हजार ४६७
संगमनेर-३ हजार १०८
नेवासा-२ हजार ८१४
राहाता-२ हजार १३
कोपरगाव-१ हजार ९२३
श्रीरामपूर-१ हजार १६१
शेवगाव-२ हजार ९१
जामखेड-१ हजार २७५
कर्जत-२ हजार ३४९
पाथर्डी-१ हजार ७४९
श्रीगोंदा-२ हजार ९१
राहुरी-९५५
नगर-२ हजार ११२
पारनेर-१ हजार ७७७