सातासमुद्रापलीकडे पारगावच्या द्राक्षांची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:19 AM2021-03-14T04:19:36+5:302021-03-14T04:19:36+5:30
श्रीगोंदा : पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील द्राक्षांची यंदा गुणवत्ता अधिक चांगली आहे. त्यामुळे येथील द्राक्ष यंदा सातासमुद्रापार पडले ...
श्रीगोंदा : पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील द्राक्षांची यंदा गुणवत्ता अधिक चांगली आहे. त्यामुळे येथील द्राक्ष यंदा सातासमुद्रापार पडले आहे. श्रीलंका, थायलंड, नेपाळ, बांगलादेशातील नागरिकांना पारगाव सुद्रिकच्या द्राक्षांची अविट गोडी लागली आहे. यंदाच्या द्राक्ष हंगामात शंभर कोटींहून अधिकची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तासगाव, नाशिक, इंदापूर परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पारगाव सुद्रिक येथील शेतकरी दहा वर्षांपासून द्राक्ष लागवडीकडे वळले आहेत. आता तर पारगावमधील युवा शेतकऱ्यांनी द्राक्ष उत्पादनात नाशिक, तासगावच्या शेतकऱ्यांना मागे टाकले आहे. येथील नव्वद टक्के शेतकरी द्राक्ष उत्पादक आहेत.
बापू लडकत, खंडू हिरवे, गोरख लडकत, शहाजी हिरवे, आबासाहेब रेपाळे, भगवान खेतमाळीस, पिंटू बोडखे, भगवान खेतमाळीस,
शरद लबडे, राजेंद्र लडकत, संतोष लडकत हे द्राक्ष उत्पादनात ‘टाॅप टेन’मधील शेतकरी आहेत.
पारगावमध्ये तीन हजार एकरावर द्राक्ष बागा आहेत. यामधून गावातील आणि परप्रांतीय मजुरांना मोठा रोजगार निर्माण झाला आहे. कृषी औषधे, रासायनिक, सेंद्रिय खतांची मोठी उलाढाल येथे होते. पॅकेजिंग, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय वाढला आहे.
गेल्या वर्षी कोरोना लाॅकडाऊनचा तडाखा बसला. त्यानंतर अतिवृष्टी झाली. अशा परिस्थितीतही पारगावमधील शेतकऱ्यांनी द्राक्षाचे चांगले उत्पादन घेतले. त्यामुळे यंदा तासगावच्या द्राक्षापेक्षा प्रती किलो १० ते १२ रुपये किलो अधिकच्या दराने विक्री होत आहे. येथील द्राक्षाला सध्या ३५ ते ४५ रुपये किलोचा दर मिळत आहे.
पारगावमध्ये द्राक्ष खरेदीसाठी पंजाब, हरियाणा, बिहार, कोलकाता, इंदाैर, गुजरात, लखनौमधील व्यापारी दाखल झाले आहेत. पारगावमध्ये ४५ हजार मेट्रिक टन द्राक्षाचे उत्पादन अपेक्षित आहे. यातून शंभर ते सव्वाशे कोटींची उलाढाल होणार आहे.
---
अनेक अडचणींवर मात करत पारगावच्या शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा फुलविल्या. यंदाही बाजारपेठेवर कोरोनाचे सावट आहे. त्यातच द्राक्ष उत्पादनात सरासरी घट असली तरी दर्जा चांगला असल्याने मागणीही आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होईल.
-पिंटू बोडखे,
द्राक्ष उत्पादक, पारगाव
--
द्राक्ष शेतीमुळे पारगावातील शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढले आहे. येथील दरडोई उत्पन्न काॅर्पोरेट शहरापेक्षाही चांगले आहे. ही समाधानाची बाब आहे
पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी
---
१३ पारगाव ग्रेप्स
पारगाव सुद्रिक येथे पॅकिंग होत असलेले द्राक्ष.