संगमनेर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच पार्किंग; स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या बसेसला अडथळा
By शेखर पानसरे | Published: April 9, 2023 02:22 PM2023-04-09T14:22:33+5:302023-04-09T14:26:40+5:30
अखेर चालकालाच बस मागे घेऊन वळवून नेण्याशिवाय पर्याय नसतो.
संगमनेर : संगमनेर बसस्थानकात पार्किंगची सोय उपलब्ध आहे. मात्र, तरीही अनेक वाहन चालक त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने बसस्थानकाच्या आवारात, प्रवेशद्वारासमोरच उभी करतात. त्यामुळे स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या बसेसला अडथळा निर्माण होऊन अनेकदा रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळते. रविवारी सुटीच्या दिवशीही (दि.०९) अशीच परिस्थिती होती.
पुणे, नाशिक, मुंबई या बड्या शहरांच्या मध्यावर संगमनेर असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. पूर्वीच्या तुलनेत सर्वच प्रकारच्या वाहनांची संख्या वाढली आहे. वाहनतळ संदर्भात संगमनेर नगर परिषदेकडून धोरण ठरविले गेले नसल्याने वाहन चालक जागा मिळेल तेथे वाहने आपली उभी करतात. परिणामी अनेक ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झालेली पहायला मिळते. पार्किंगची समस्या शहरात अनेक ठिकाणी सारखीच आहे.
नव्याने संगमनेर बसस्थानक आणि व्यापारी संकुल बांधण्यात आले. व्यापारी संकुलासमोर काही प्रमाणात वाहने उभी राहतील, अशी पार्किंगची सोय आहे. मात्र, तरीही बसस्थानकाच्या आवारात मोठ्या संख्येने खासगी दुचाकी, चारचाकी वाहने नेहमीच उभी असतात. अनेक वाहन चालक आपली वाहने बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ उभी करतात. त्यामुळे स्थानकात जाणाऱ्या अथवा बाहेर पडणाऱ्या बसेसला अडथळा होतो. बसचालक हॉर्न वाजवून वैतागून जातात. अखेर चालकालाच बस मागे घेऊन वळवून नेण्याशिवाय पर्याय नसतो.