पावसाळ्यात पारनेरकरांना दुष्काळी झळा
By Admin | Published: August 5, 2016 11:37 PM2016-08-05T23:37:44+5:302016-08-05T23:44:02+5:30
पारनेर : आॅगस्ट उजाडला तरी अजूनही अपुऱ्या पावसामुळे पारनेर तालुक्यातील सुमारे २२३ तलाव कोरडेठाक आहेत.
पारनेर : आॅगस्ट उजाडला तरी अजूनही अपुऱ्या पावसामुळे पारनेर तालुक्यातील सुमारे २२३ तलाव कोरडेठाक आहेत. अनेक गावांना वरदान ठरणारे मांडओहोळ प्रकल्प, काळू प्रकल्प व हंगा तलावातही अत्यल्प पाणीसाठा असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यावर ऐन पावसाळ्यातच दुष्काळाचे सावट पसरले आहे.
पारनेर तालुक्यात दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाणच अत्यल्प आहे. गेल्यावर्षी शेवटच्या अवकाळी पावसाने पारनेरसह तालुक्याला थोड्या प्रमाणात तारले होते. मात्र यंदा जून,जुलै संपून आॅगस्ट महिना उजाडला तरी अजुनही पावसाचे दमदार आगमन झाले नसल्याने पारनेर शहर, लोणी हवेली, हंगा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या हंगा तलावात अत्यल्प पाणीसाठा आहे. तर तालुक्याच्या उत्तर भागाला वरदान ठरणाऱ्या मांड ओहोळ प्रकल्पातही पाणीसाठा खालावलेलाच असल्याने भविष्यात टाकळी ढोकेश्वरसह कर्जुले हर्या, सावरगाव, पळसपूर, पोखरी व परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तर ढवळपुरीजवळील काळू प्रकल्पातही कमी पाणीसाठा शिल्लक असून त्यामुळे भाळवणी,ढवळपुरी या गावांची पाणीपुरवठा योजना संकटात सापडण्याची शक्यता आहे. ढोकीमधील दोन तलावही कोरडेठाक आहेत. गेल्या काही वर्षापासून तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबर चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे.
(तालुका प्रतिनिधी)