हिवताप निर्मुलनासाठी जनतेने सहभाग द्यावा : डॉ.पी.डी.गांडाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:24 PM2019-04-25T13:24:48+5:302019-04-25T13:24:59+5:30
डासांच्यामार्फत पसरणारे आजारांमध्ये हिवताप, डेंग्युमध्ये सारखे जीवघेणे आजार होवू शकतात. म्हणूनच डासांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
अहमदनगर : डासांच्यामार्फत पसरणारे आजारांमध्ये हिवताप, डेंग्युमध्ये सारखे जीवघेणे आजार होवू शकतात. म्हणूनच डासांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा हिवताप निर्मुलनाच्या माध्यमातून जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून जनतेने ही त्यात सहभाग दिला पाहिजे. सप्ताहातून एक दिवस कोरडा दिन पाळून सहकार्य करावे, असे आवाहन हिवताप नाशिक विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी केले.
अहमदनगर जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत २५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन साजरा करुन जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ.पी.पी.गांडाळ, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रजनी खुणे, लायन्स क्लबचे हरजितसिंग वधवा, संदेश कटारिया, कुष्ठरोग संचालक डॉ. शिंदे , नर्सिंग कॉलेजच्या अनिता कटारिया, डॉ.राठोड आदि मान्यवर उपस्थित होते.
हिवतापाबद्दल संशोधन करणारे सर डोनल्ड रॉस यांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी काढण्यात आलेल्या प्रभाग फेरीला डॉ.सांगळे, हरजितसिंग वधवा, डॉ.रजनी खुणे यांनी हिरवा झेंडा दाखविला. शहराच्या प्रमुख मार्गावरुन ही प्रभात फेरी काढण्यात आली.
दरवर्षी २५ एप्रिलला हिवताप दिन साजरा होतो. डासांमार्फत होणारे वेगवेगळे आजार डेंग्यु, चिकणगुण्या, हिवतापाला आळा घातला पाहिजे, त्यासाठी गप्पी मासे पाळले पाहिजे, एक दिवसाचा हा उपक्रम न राहता वर्षभर त्याचे पालन केले पाहिजे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्तविकात जिल्हा हिवताप सहाय्यक संचालक डॉ.आर.डी.देशपांडे यांनी २००८ पासून जागतिक हिवताप निर्मुलन दिन साजरा होतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जावून हिवताप नियंत्रण कसे करायचे याचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांनी हिवताप निर्मुलनची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी एस.आर.सावंत, आरोग्य अधिकारी जी.एस.कर्डिले, आरोग्य सहाय्यक एस.डी.काळे, श्रीमती एम.बी.पंडीत, आणि एम.डी.वैराळ यांच्यासह अन्य कर्मचा-यांचा पुरस्काराने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुरुषोत्तम आडेप, डॉ.दादासाहेब साळूंके यांच्यासह जिल्हा हिवताप कार्यालयातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.