पॅसेंजर रेल्वे २६ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार; प्रवाशांचे सणासुदीत हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 01:32 PM2019-10-09T13:32:45+5:302019-10-09T13:34:43+5:30
नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने दौंड-मनमाड दरम्यान धावणाºया शिर्डी फास्ट पॅसेंजरसह सहा पॅसेंजर गाड्या १६ जूनपासून २६ सप्टेंबर बंद केल्या होत्या. मात्र डेडलाईन संपली तरीही पॅसेंजर गाड्या चालू झाल्या नाहीत. रेल्वे प्रशासनाने पुन्हा आदेश काढून २६ डिसेंबरपर्यंत तीन महिने या गाड्या बंद रहाणार असल्याचे जाहीर केले आहे. तशा प्रकारच्या सूचना विसापूरसह इतर रेल्वे स्थानकांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या आहेत.
नानासाहेब जठार ।
विसापूर : नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने दौंड-मनमाड दरम्यान धावणाºया शिर्डी फास्ट पॅसेंजरसह सहा पॅसेंजर गाड्या १६ जूनपासून २६ सप्टेंबर बंद केल्या होत्या. मात्र डेडलाईन संपली तरीही पॅसेंजर गाड्या चालू झाल्या नाहीत. रेल्वे प्रशासनाने पुन्हा आदेश काढून २६ डिसेंबरपर्यंत तीन महिने या गाड्या बंद रहाणार असल्याचे जाहीर केले आहे. तशा प्रकारच्या सूचना विसापूरसह इतर रेल्वे स्थानकांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या आहेत.
मागील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने सतत पॅसेंजर गाड्या बंद करण्यात येत आहेत. गेल्या तिने महिन्यांपासून मात्र शिर्डी-सीएसटी मुंबई फास्ट पॅसेंजरही बंद करण्यात आली आहे. या बंद गाड्यात साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजरला कात्री लावण्यात आल्याने साईभक्तांना त्रास सहन करावा लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांचे नोटीस बोर्डवर लावलेल्या आदेशानुसार दौंड-नांदेड, पुणे-निजामाबाद,मुंबई-शिर्डी डाउन व नांदेड-दौंड, निजामाबाद-पुणे, शिर्डी- मुंबई या अपगाड्या २६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. पॅसेंजर गाड्या म्हणजे गरीबांचा रथ समजला जातो. त्याच गाड्यांवर रेल्वेकडून रेल्वेलाईन दुरुस्ती करण्याच्या नावाखाली वारंवार बंदचे हत्यार चालवले जात आहे. सतत पॅसेंजर गाड्या बंद राहिल्याने सामान्य प्रवासी रेल्वे प्रवासापास्ूुन दुरावत चालला आहे. दौंड-मनमाड रेल्वे लाईनवर दिवसा एकही पॅसेंजर गाडी नसल्याने विसापूर, बेलवंडी, श्रीगोंदा, काष्टी, सारोळा, अकोळनेर यासारखी स्थानके ओस पडली आहेत. प्रवासीही पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार याची चौकशी करून वैतागले आहेत. दौड-मनमाड मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके केवळ क्रॉसिंग स्टेशन बनली आहेत.
ऐन सणासुदीत प्रवाशांचे हाल
मागील वर्षी दसरा व दीपावली या काळात इतर वेळी बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या चालू केल्या होत्या. दीपावलीचे काळात अनेक चाकरमान्यांना सुट्ट्या असतात. बाहेर गावी रोजगारासाठी गेलेले लोक गावाकडे येऊन सण साजरा करतात. ऐन दीपावलीचे काळातही पॅसेंजर गाड्या बंद ठेवण्याचे रेल्वे प्रशासनानाचे धोरण अतिशय अयोग्य आहे. त्यामुळे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे.