रेल्वेतील प्रवाशांना कोरोनाची भितीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:38 AM2021-03-04T04:38:20+5:302021-03-04T04:38:20+5:30

केडगाव : देशभर कोरोनाचा सध्या पुन्हा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वांनाच काेरोना बाबतच्या नियम पाळणे बंधनकारक केलेले असताना रेल्वेतून ...

Passengers on the train are not afraid of the corona | रेल्वेतील प्रवाशांना कोरोनाची भितीच नाही

रेल्वेतील प्रवाशांना कोरोनाची भितीच नाही

केडगाव : देशभर कोरोनाचा सध्या पुन्हा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वांनाच काेरोना बाबतच्या नियम पाळणे बंधनकारक केलेले असताना रेल्वेतून तेही आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्यांना मात्र त्याचे फारसे गांभीर्य दिसत नाही. येथे अनेक प्रवासी विनामास्क दूरवरचा प्रवास करताना सर्रास दिसतात. हे चित्र ‘लोकमत’ प्रतिनिधींनी नगर रेल्वे स्टेशनमध्ये एका एक्स्प्रेसच्या थेट डब्यात जाऊन बुधवारी सकाळी टिपले.

मागील मार्च महिन्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रवास बंद होता. मात्र नंतर काही नियम, अटी, शर्थींची अंमलबजावणी करीत पुन्हा काही विशेष गाड्या चार ते पाच महिन्यांनंतर सुरू करण्यात आल्या. रेल्वे स्थानकात ज्याच्याकडे मास्क आहे व ज्याचे तिकीट निश्चित आहे, अशांनाच प्रवेश दिला जातो. हा नियम आजही नगरच्या रेल्वे स्थानकात पाळला जातो. नोव्हेंबरपर्यंत सर्व स्थानक दररोज सॅनिटायझर केले जात होते. एवढेच नव्हे तर प्रत्येक प्रवाशाचे तापमान व ऑक्सिजन लेवलची तपासणी करूनच त्याला आत प्रवेश दिला जात होता. सध्या ही तपासणी बंद आहे. आता मात्र फक्त मास्क व तिकीट असले तरच प्रवेश दिला जात आहे. रेल्वे स्थानकात आल्यानंतर मात्र सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर पाहणी होत नाही. बहुतेक प्रवासी मास्क फक्त गळ्यात अडकवून फिरत असल्याचे दिसले.

नगरच्या रेल्वे स्थानकात आलेल्या लांब पल्ल्याच्या गाडीत रेल्वेच्या आरक्षित डब्यात जाऊन पाहणी केली असता ७० ते ८० टक्के प्रवाशांनी आपले मास्क बॅगमध्ये ठेवून प्रवास करीत असल्याचे दिसून आले. काही प्रवासी फिजिकल डिस्टन्सिंगचा हरताळ फासत दाटीवाटीने प्रवास करणेच पसंद करतात. काही प्रवासी स्वत:ची काळजी घेत सॅनिटायझर वापरत होते. रेल्वे पोलीस अधिकारी स्थानक परिसर व प्लॅटफॉर्मवर नियमांची अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी करताना दिसू आले. रेल्वे तिकीट काउंटरवर ही मास्क गळ्यात अडकवून एकमेकांना चिकटून रांगेत घोळका करीत उभे होते.

---

विनामास्क बाबत अद्याप कारवाई नाही..

नगरच्या रेल्वेस्थानकात रोजची स्वच्छता व साफसफाई केली जाते. स्थानकात येण्यासाठी असणारे इतर दरवाजे बंद आहेत. फक्त मुख्य प्रवेशद्वारातून प्रवाशांना प्रवेश दिला जातो. मास्क व तिकीट पाहूनच आत प्रवेश दिला जातो. मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रूपये दंड असला तरी अद्याप कोणावरच दंडात्मक कारवाई केली नसल्याचे तपासणी कर्मचाऱ्याने सांगितले.

--

कोरोनाबाबत आम्ही काय काळजी घेतो. कोणत्या गोष्टींची अंमलबजावणी करतो, याची माहिती देऊ शकत नाही. मला तशी माहिती देता येणार नाही. आपण सोलापूर विभागातील जनसंपर्क अधिकाऱ्याशी संपर्क करू शकता.

-एन. पी. तोमर,

रेल्वे प्रबंधक, नगर

---

०३ नगर रेल्वे, १

नगर रेल्वेस्थानकातील तिकीट काउंटरवर व रेल्वेत विनामास्क असलेले प्रवासी. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा.

Web Title: Passengers on the train are not afraid of the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.