पाथर्डी : रुपलाचा तांड्यामधील चा-याच्या ८ गंजी जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 11:12 AM2019-01-10T11:12:43+5:302019-01-10T11:13:25+5:30
तालुक्यातील माणिकदौंडी गावा अंतर्गत येणा-या रुपलाचा तांडा येथे रात्री उशिरा लागलेल्या आगीत शेतक-यांनी जनावरासाठी जमा करून ठेवलेल्या दीड लाख रुपये किमतीच्या चा-याच्या गंजी जळून खाक झाल्या.
पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी गावा अंतर्गत येणा-या रुपलाचा तांडा येथे रात्री उशिरा लागलेल्या आगीत शेतक-यांनी जनावरासाठी जमा करून ठेवलेल्या दीड लाख रुपये किमतीच्या चा-याच्या गंजी जळून खाक झाल्या.
पाथर्डीपासून दक्षिणेला वीस किलोमीटर अंतरावर रुपलाचा तांडा असून याठीकाणच्या शेतक-यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाळलेल्या पिकाचा, गवताचा मोठ्या प्रमाणावर चारा जनावरांसाठी गोळा करून एकत्रित ठिकाणी ८ गंजी लावून ठेवलेल्या होत्या. गुरुवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास शेतकरी विनायक राठोड, शिवाजी राठोड, साहेबराव राठोड, उत्तम राठोड, बबन राठोड यांच्या मालकीच्या गंजीला अचानक आग लागल. ही बाब लक्षात येताच शेतक-यांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर असल्याने आगी जवळ जाता आले नाही. त्यावेळी पाथर्डी पालिकेच्या अग्निशामक दलाला मदतीसाठी फोन करण्यात आला परंतु फोन उचलण्यात आला नाही. सकाळी १० वाजे पर्यंत मदत मिळाली नसल्याने आजबाजूच्या सर्व चा-याच्या गंजी जळून खाक झाल्या. अग्निशामक बंबाची मदत लवकर मिळाली असती तर आटोक्यात आली असती असे स्थानिक युवक प्रकाश राठोड यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.