पाथर्डी तालुका : वॉटर कप स्पर्धेतील १६ गावांना पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 05:29 PM2018-06-14T17:29:41+5:302018-06-14T17:29:48+5:30
भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेसाठी पॉकलेन व जे.सी.बी. मशीन पुरविण्यात आली. या माध्यमातून तालुक्यातील सोळा गावांमध्ये १ अब्ज, ३५ कोटी, ८२ लाख ५० हजार लीटर पाणी साठा होणार आहे. त्यामुळे आता या सोळा गावांना पावसाची प्रतीक्षा आहे.
पाथर्डी : भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेसाठी पॉकलेन व जे.सी.बी. मशीन पुरविण्यात आली. या माध्यमातून तालुक्यातील सोळा गावांमध्ये १ अब्ज, ३५ कोटी, ८२ लाख ५० हजार लीटर पाणी साठा होणार आहे. त्यामुळे आता या सोळा गावांना पावसाची प्रतीक्षा आहे.
अभिनेता अमीर खानच्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ४२ गावांची निवड झाली. त्यापैकी १६ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. ही कामे करतांना पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत पाथर्डी तालुक्याची निवड झाली. तालुक्यातील ४२ गावे यामध्ये सहभागी झाली. ४२ गावांमध्ये श्रमदान सुरू झाले. त्यापैकी १६ गावांनी श्रमदानाचे १५ गुण पूर्ण केले. या गावांना पॉकलेन व जे.सी.बी. मशिन भारतीय जैन संघटना, पाथर्डी यांच्यामार्फत पुरविण्यात आले. नदी, बंधारे, पाझर तलावाचे रूंदीकरण, खोलीकरण, दुरूस्ती डोंगरतळ्यावर चर खोदणे, शेततळे इत्यादी कामातून पाणी साठविण्याची क्षमता वाढली आहे. पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक बंडू ढगे, भारतीय जैन संघटनेचे तालुका प्रकल्प संचालक विश्वजित गुगळे व त्यांचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन संयुक्तरित्या फिरले. सरपंच, गावकऱ्यांशी संपर्क साधून श्रमदान तसेच मशीन कामाविषयी जनजागृती केली.
भारतीय जैन संघटनेतर्फे भिलवडे, चिचोंडी, पिंपळगांव टप्पा, जोगेवाडी, मोहरी, माळेगांव, पागोरीपिंपळगाव, भालगाव, मुंगुसवाडे, पारेवाडी, वसूजळगाव, करोडी, देवराई, मिरी, आगसखांड, खेर्डे आदी गावात जलसंधारणाची कामे झाली आहेत.
पाथर्डी तालुक्यात भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या नेतृत्वाखाली जलसंघारणाचे काम पूर्ण केले आहे. २२६३७ तास पॉकलेन व जे.सी.बी.चालविण्यात आला आहे. त्यामुळे पाणी साठविण्याची क्षमता वाढली असून सोळा गावे पाणीदार होणार आहेत. याचा आदर्श घेऊन पुढील वर्षी अन्य गावे यामध्ये सहभागी होतील असा विश्वास आहे.
-विश्वजित गुगळे, तालुका प्रकल्प संचालक, भारतीय जैन संघटना