मनपाच्या कोविड सेंटरकडे रुग्णांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:20 AM2021-04-15T04:20:37+5:302021-04-15T04:20:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: नगर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन महापालिकेने तीन कोविड केअर सेंटर सुरू केले; ...

Patients turned their backs on the Corporation's Kovid Center | मनपाच्या कोविड सेंटरकडे रुग्णांनी फिरविली पाठ

मनपाच्या कोविड सेंटरकडे रुग्णांनी फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: नगर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन महापालिकेने तीन कोविड केअर सेंटर सुरू केले; परंतु या सेंटरमध्ये रुग्ण दाखल होत नसल्याने दीडशेहून अधिक बेड रिकामे आहेत. या उलट खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाल्याने मनपाचे कोविड केअर सेंटर रिकामे, खासगी रुग्णालये फुल्ल असे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.

नगर शहरात बुधवारी ४९६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेच्या अहवालानुसार शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ५४६ इतकी आहे. सध्या महापालिकेच्या नटराज कोविड केअर सेंटरमध्ये १४२, जैन पितळे बोर्डिंग येथे ५८ आणि केडगाव येथील डॉन बास्को येथे ४७ लक्षणे नसलेले रुग्ण दाखल झालेले आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मनपाने कोविड सेंटर वाढविण्याचीही तयारी केली होती. परंतु, सध्याच्या कोविड केअर सेंटरमधील खाटा शिल्लक असल्याने मनपाने सेंटर सुरू करण्याबाबत हात आखडता घेतला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण मोठे होते. शासकीय तंत्रनिकेतन येथील कोविड सेंटरमध्ये दोन महिन्यात १ हजार ७०० रुग्ण दाखल झाले होते. सावेडीतील आनंद लॉन, आयुर्वेद महाविद्यालय, नटराज, बडीसाजन आदी कोविड केअर सेंटर फुल्ल झाले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या मोठी असल्याने त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता भासत आहे; परंतु यापैकी कोणत्याही सुविधा महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्याआधी ऑक्सिजनचे बेड आहे का अशी विचारणा करतात. त्यांना नाही असे उत्तर मिळाल्यानंतर ते खासगी रुग्णालयांचा रस्ता धरतात. याशिवाय बहुतांश लक्षणे नसलेले रुग्ण घरी उपचार घेत आहेत. त्यामुळे मनपाच्या कोविड केअर सेंटरमधील खाटा रिकाम्या राहत असल्याचे सांगण्यात आले.

...

एकमेव बुथ हॉस्पिटल फुल्ल

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी नगरमधील पहिले कोविड सेंटर येथील बुथ हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही हे रुग्णालय फुल्ल होते. सध्याही या रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत. या रुग्णालयात ऑक्सिजनचे बेड असल्याने रुग्णांची पहिली पसंती बुथ रुग्णालयाला असते. त्यामुळे हे रुग्णालय फुल्ल झाले आहे.

....

कोरोनाबाधितांचे प्रमाण २२ टक्के

महापालिकेच्या वतीने दररोज १ हजार २०० नागरिकांची चाचणी केली जात आहे. बुधवारी १२०० पैकी ४९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यावरून शहरातील कोरोना बाधित रुग्णांचे २१.९२ टक्के इतके आहे.

....

- शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन कोविड सेंटर वाढविण्याची तयारी केलेली आहे. सध्या तीन सेंटर सुरू आहेत. या सेंटरमधील बेड रिकामे आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी सेंटर सुरू केले जातील.

- यशवंत डांगे, उपायुक्त, महापालिका

...

मनपाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्ण

नटराज- १४२

जैन पितळे बोर्डिंग-५८

डॉनबास्को-४७

Web Title: Patients turned their backs on the Corporation's Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.