केंद्रीय अर्थमंत्र्यांची पवारांनी घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:26 AM2021-09-15T04:26:26+5:302021-09-15T04:26:26+5:30
कर्जत : कर्जत-जामखेडच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन ...
कर्जत : कर्जत-जामखेडच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन कर्जत-जामखेडच्या विकासासाठी निधीची मागणी केली. तसेच विविध विकासात्मक धोरणांबाबत चर्चा केली.
कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक प्रभाव हा असंघटित क्षेत्रातील महिला आणि कामगारांवर पडला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ग्रामीण भागातील गरिबीचा सापळा तोडण्यात यशस्वी झाला आहे. याच धर्तीवर शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक आणि खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा, यासाठी आमदार पवार यांनी निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली. तसेच कर्जत-जामखेड मतदारसंघात बँकांची संख्या कमी आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारात अडचणी येतात. त्यामुळे सावकारकी वाढली आहे. ही सावकारकी मोडून काढण्यासाठी शासनाच्या मदतीने प्रयत्न केला जातोय. या परिस्थितीमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार याठिकाणी अधिक प्रमाणात वाढावे आणि येथील स्थानिक नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांना संघटित बँकिंग व्यवस्थेच्या मदतीने अर्थसहाय्य मिळावे, अशी विनंती पवार यांनी सितारामन यांना केली.
..........
राष्ट्रीय वयोश्री योजनेत नगरचा समावेश करा
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांची भेट घेऊन आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेत अहमदनगर जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी निवेदन दिले. ही योजना दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना मिळावा, अशी विनंती पवार यांनी केली.
............
केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन हस्तकलेचा वारसा जतन होण्यासाठी उस्ताद योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात होण्यासाठी निवेदन दिले. या योजनेत कर्जत, जामखेड तालुक्याचा समावेश व्हावा, अशी मागणी पवार यांनी नकवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
.........
१४ रोहित पवार
विविध मागण्यांचे निवेदन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देताना आमदार रोहित पवार.