नगरच्या जागेवरुन पवार-विखे संघर्ष पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:39 PM2019-03-12T12:39:22+5:302019-03-12T12:39:40+5:30
विखे यांना आम्ही पराभूत केल्याचा इतिहास राज्याला माहित आहे हा दाखला देत राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरच्या जुन्या राजकारणाला पुन्हा फोडणी दिली आहे.
सुधीर लंके
अहमदनगर : विखे यांना आम्ही पराभूत केल्याचा इतिहास राज्याला माहित आहे हा दाखला देत राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरच्या जुन्या राजकारणाला पुन्हा फोडणी दिली आहे.
पवारांच्या या विधानामुळे कॉंग्रेस आघाडीत प्रमुख असलेले पवार व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यातच राज्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय यांची या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी करण्याची इच्छा होती. मात्र, राष्ट्रवादी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सुजय भाजपच्या वाटेवर आहेत. विखे तुल्यबळ असताना त्यांना
मतदारसंघ का सोडला जात नाही? असा प्रश्न पवार यांना पुण्यात पत्रकारांनी केला असता ‘दिवंगत बाळासाहेब विखे यांना आम्हीच या मतदारसंघातून पराभूत केले
होते’ असा जुना संदर्भ पवार यांनी दिला.
१९९१ च्या निवडणुकीत काँग्रेसचे यशवंतराव गडाख यांनी बाळासाहेब विखे यांना पराभूत केले होते. मात्र, पवार व गडाख यांनी प्रचारात आपले चारित्र्यहनन केले असा आरोप करत विखे यांनी उच्च न्यायालयात खटला भरला होता. त्यात पवार सुरुवातीला अडचणीत आले होते. ही सल पवार यांच्या मनात आजही कायम असल्याचे त्यांच्या वरील विधानातून स्पष्ट झाले.
‘झाले गेले विसरुन जाऊ. सुजय तुमचा नातू आहे’, असे आवाहन राधाकृष्ण विखे यांनी पवारांना केले होते. मात्र, त्यानंतरही पवार आपल्या भूमिकेवर ठाम दिसतात. त्यामुळे आता या दोन नेत्यांतच संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. त्याचा परिणाम आघाडीवरही होऊ
शकतो.
दोन दिवस थांबा-गडाख
प्रशांत गडाख यांची भूमिका समजावून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता, दोन दिवस थांबा सर्व चित्र स्पष्ट होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. गडाख यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय उत्सुकता वाढली आहे.
पुन्हा विखे-गडाख लढत
सुजय विखे भाजपमध्ये गेल्यास माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र प्रशांत गडाख यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यातून मतदारसंघातील विखे-गडाख खटल्यातील जुने संदर्भ पुन्हा जागे होतील. राष्टÑवादीचे आमदार अरुण जगताप यांचेही नाव चर्चेत आहेत. गडाख किंवा जगताप हेच नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेते पदाबाबत प्रश्नचिन्ह
सुजय विखे हे मंगळवारी भाजप प्रवेश करत आहेत. दुसरीकडे त्यांचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे काँग्रेसच्या उमेदवार छाननी समितीत सदस्य आहेत. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर विखे यांच्या विरोधी पक्षनेते पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे. राष्टÑवादी व काँग्रेसचे नेतेही याबाबत आक्षेप घेण्याची शक्यता वर्तवली जाते. विखे स्वत:ही राजीनामा देऊ शकतात.