महापौर पदासंदर्भात पवारांचे गुफ्तगू
By Admin | Published: May 16, 2016 11:16 PM2016-05-16T23:16:03+5:302016-05-16T23:25:00+5:30
अहमदनगर : महापौरपदाची निवडणूक जूनमध्ये होत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जगताप-कळमकर यांच्याशी आगामी निवडणुकीसंदर्भात सोमवारी येथे गुफ्तगू केले.
कामाला लागण्याचा आदेश : ऐनवेळी शीतल जगताप यांची उमेदवारी?
अहमदनगर : महापौरपदाची निवडणूक जूनमध्ये होत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जगताप-कळमकर यांच्याशी आगामी निवडणुकीसंदर्भात सोमवारी येथे गुफ्तगू केले. महापौर पदाच्या निवडणुकीच्यादृष्टीने कामाला लागा, असा आदेश त्यांनी दिला असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
महापौर पदासाठी सुवर्णा कोतकर व नीता घुले यांनी नकार दर्शविल्याची माहिती असून ऐनवेळी आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल या महापौर पदाच्या उमेदवार असतील, अशीही चर्चा सुरु झाली आहे.
दिवंगत शंकरराव घुले कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी पवार नगरला आले होते. या भेटीनंतर पवार हे दादा कळमकर यांच्या निवासस्थानी थांबले होते. तेथे त्यांनी शहराची बदललेली राजकीय गणिते समजून घेतली. जून महिन्यात महापौर पदाची निवडणूक होत असून महापालिकेतील राजकीय गणित काय? कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक आहेत, याची विचारणा पवार यांनी केली. आमदार अरुण जगताप, दादा कळमकर यांनी सार्वत्रिक निवडणूक ते पोटनिवडणुकीनंतरची राजकीय परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर पवार यांनी कामाला लागण्याचा आदेश दिला.
दोन्ही कॉंग्रेसकडून महापौर पदाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. कॉँग्रेसच्या उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांच्या कुटूंबातून अद्याप ‘होकार’ मिळालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार कोतकर कुटुंब इच्छूक नाही.
नीता घुले यांचे नाव चर्चेत असले तरी गणिते जुळविण्यासाठी ते तयार होतील का? हा प्रश्न आहे. त्यामुळे ऐनवेळी आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल यांचे नाव समोर येण्याची शक्यताही वर्तवली जाते. जगताप गणिते जुळवितात असा आजवरचा अनुभव असल्याने राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक निर्धास्त आहेत.
(प्रतिनिधी)
भाजपची भूमिका काय?
भाजपचे नेते दिलीप गांधी व शिवाजी कर्डिले काय भूमिका घेतात याकडेही लक्ष लागले आहे. गांधी यांचे सेनेशी जमत नाही व जगताप यांच्याशी सख्य आहे. शिवाजी कर्डिले यांचीही भूमिका जगताप व कोतकर या दोन्ही परिवारांबाबत सौम्यच असते. ते भाजपपेक्षा ‘सोधा’ पक्ष जपतात. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीच मुसंडी मारेल, अशी चर्चा सुरु झाली आहे.