जामखेडच्या पाण्याला विरोध केल्याचे पवारांचे ‘ते’ पत्र आमच्याकडे-सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:53 AM2019-09-21T11:53:49+5:302019-09-21T11:54:11+5:30
कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या शेतीसाठी कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी विरोध केला होता. त्यांनी त्यावेळी दिलेल्या पत्रात कर्जत, जामखेडला पाणी देता येणार नाही, असे म्हटले होते. ते पत्र आजही आमच्याकडे आहे, असेही सुजय विखे यावेळी म्हणाले.
जामखेड : कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या शेतीसाठी कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी विरोध केला होता. त्यांनी त्यावेळी दिलेल्या पत्रात कर्जत, जामखेडला पाणी देता येणार नाही, असे म्हटले होते. ते पत्र आजही आमच्याकडे आहे, असेही सुजय विखे यावेळी म्हणाले.
जामखेड येथे शुक्रवारी भाजपा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी विखे बोलत होते. विखे पुढे म्हणाले, कर्जत-जामखेड तालुक्याला कुकडीचे हक्काचे पाणी देण्यास अजित पवारांनी कायम विरोध केला. हक्काच्या पाण्यापासून येथील जनतेला कायम वंचित ठेवले. त्याच घरातील रोहित पवारांना कर्जत-जामखेडच्या पाणी प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राम शिंदे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व करताना केलेली कामे मोठी आहेत. त्यामुळे पवारांच्या भूलथापांना बळी पडू नका. पवार कुटुंबीयांनी आम्हाला गेली ३० वर्षे सतत त्रास दिला आहे. त्यांच्या घरातील उमेदवाराचे आम्ही डिपॉझिट जप्त करायला लावू, अशी टीका केली.
लोकसभा निवडणुकीत बाहेरचा उमेदवार म्हणून बॅनर लावून त्यांनी माझ्यावर टीका केली होती. मात्र जनता विखे कुटुंबासोबत राहिली. आता कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्टवादीकडूनही परका उमेदवार उभा राहत आहे. त्याचे येथील जनता डिपॉझिट जप्त करेल, अशी टीका खासदार विखे यांनी रोहित पवार यांच्यावर केली.