पाचपुते प्रकरणाकडे पवारांचा कानाडोळा
By Admin | Published: August 9, 2014 11:11 PM2014-08-09T23:11:15+5:302014-08-09T23:32:30+5:30
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत असलेली घुसमट, यामुळे नाराज झालेले माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे निश्चित केले.
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत असलेली घुसमट, यामुळे नाराज झालेले माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे निश्चित केले. त्यावर जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी त्यांची समजूत काढत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोर्टात हा विषय काढण्याचे आश्वासन दिले. शनिवारच्या पुणे भेटीत खुद्द पवार यांनीच अभंग यांना या विषयांवर नंतर बोलू’ असे सांगत पाचपुते प्रकरणाकडे सपशेल कानाडोळा केला. पाचपुते आता काय भूमिका घेतात याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवानंतर दक्षिण जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले. पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या संशयावरून पक्षातून आ. पाचपुते यांची कोंडी करण्यात आली असल्याची चर्चा आहे. यावरून नाराज झालेले पाचपुते थेट पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांना याची मानसिकता तयार करून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, पाचपुते यांच्या संभाव्य बंडाबाबत पक्षातून एकाही नेत्याने जाहीरपणे दखल घेतलेली नाही. पक्षीय पातळीवर असणाऱ्या शांततेमुळे पाचपुते सध्यातरी एकाकी पडल्याचे चित्र आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच विरोधकांकडून पाचपुते यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत असून ते पक्षाला इमोशनल ब्लॅकमेल करीत आहेत. त्यांचा नाराजीनामा हा त्यांचा नौटंकीपणा आहे. साईकृपा कारखान्याला कर्ज दिले नसल्याच्या नावाखाली सत्तेची खुर्ची टिकविण्यासाठी त्यांची धडपड आहे. बारामतीसारखा विकास करण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या पाचपुते यांनी घोषणांचा पाऊस पाडला. विकासाऐवजी तालुका भकास केल्याचा आरोप जनसेवा विकास मंडळाचे अध्यक्ष घनशाम शेलार यांंनी केला आहे. नाराजीनाम्यानंतरही पक्षाकडून दखल घेतली गेली नसल्याने पाचपुते शांत आहेत. त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही यामुळे पक्षासह पाचपुते यांनीही आपले पत्ते बंद ठेवले आहेत.
(प्रतिनिधी)
पुण्यात शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात आपण आ. बबनराव पाचपुते प्रकरण त्यांच्या कानावर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी पवार यांनी या विषयांवर १५ तारखेनंतर सविस्तर चर्चा करू असे स्पष्टपणे सांगितले.
-पांडुरंग अभंग,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस