शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट द्या, अन्यथा २२ डिसेंबरला आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:34 AM2020-12-14T04:34:09+5:302020-12-14T04:34:09+5:30
अहमदनगर : तालुक्यातील नागवडे, जगताप, साजन शुगर हे तीनही कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. नियमानुसार ...
अहमदनगर : तालुक्यातील नागवडे, जगताप, साजन शुगर हे तीनही कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. नियमानुसार ऊसतोडणीनंतर पंधरा दिवसांत एफआरपीनुसार पेमेंट देणे बंधनकारक आहे. मात्र, श्रीगोंदा तालुक्यासह जिल्ह्यातील एकाही कारखान्याने शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट दिलेले नाही. तरी या कारखान्यांनी उसाचे पेमेंट तत्काळ द्यावे, अन्यथा २२ डिसेंबरला नगर येथील प्रादेशिक सहकारी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी दिला.
याबाबतचे निवेदन भोस यांनी शुक्रवारी नगर येथे प्रादेशिक साखर सहसंचालक यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील जगताप (कुकडी) कारखाना व साईकृपा हिरडगाव यांच्यावर ‘आरआरसी’ची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याबाबत पुढे जप्तीची कारवाई झाली नाही. यावर्षीच्या चालू गळीत हंगामापूर्वी जुने देणे व व्याज देणे गरजेचे होते. मात्र, तेही अद्याप दिले गेले नाही. जगताप कारखान्याकडून मागील हंगामाचे शेतकऱ्यांचे प्रतिटन पाचशे रुपयांचीही अनेकांची बाकी आहे. हिरडगावच्या साईकृपा कारखान्याकडूनही शेतकऱ्यांचे व वाहतूकदारांचे थकीत पेमेंट येणे बाकी आहे. यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला तरीही चालू गळीत हंगामातील शेतकऱ्यांचे पेमेंट अजून मिळालेले नाही. मागीलवर्षी टिळक भोस व सहकारी यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते व आमदार राहुल जगताप यांच्या निवासस्थानासमोर ९० दिवस ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतरही पाठपुरावा केला होता, असे निवेनात म्हटले आहे.
फोटो : १३ टिळक भोस
टिळक भोस यांनी शुक्रवारी नगर येथे प्रादेशिक साखर सहसंचालक यांची भेट घेऊन निवेदन दिले.