कृषी विद्यापीठात ठिबकची माहिती पाझरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:50 PM2018-06-29T15:50:43+5:302018-06-29T15:51:02+5:30
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे किती क्षेत्र पाणलोटाखाली, किती ठिबकखाली यांची आकडेवारी राहुरीत उपलब्ध नसल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली.
भाऊसाहेब येवले
राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे किती क्षेत्र पाणलोटाखाली, किती ठिबकखाली यांची आकडेवारी राहुरीत उपलब्ध नसल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली. सिंचन पध्दतीच्या माहितीसाठी विद्यापीठाने राज्यात तब्बल १४० ठिकाणी अपील करून माहिती घेण्याची अजब सूचना केली आहे.
मातृभूमी संस्थेने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जमीन, आकडेवारी व त्यावर वापरण्यात आलेली ठिबक व तुषार क्षेत्राची माहिती विचारली होती. विहीर व बोअरखालील क्षेत्र, पाटपाण्याचे क्षेत्र, पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र,मुळा धरणातून मिळणारे पाणी यासंदर्भात ही माहिती विचारली होती. विद्यापीठाची आठ हजार हेक्टर जमीन असून मुख्य कार्यालय राहुरीत आहे. असे असताना सहयोगी संशोधन संचालक तथा जनमाहिती अधिकारी विठ्ठल शेंडे यांनी विद्यापीठाचे दहा जिल्ह्यात कार्यक्षेत्र असल्याचे नमूद केले़ ९ कृषी महाविद्यालये, ८ कृषी तंत्र विद्यालय, २७ संशोधन केंद्रातील ४४ संशोधन प्रकल्प,७६ संशोधन योजना यांच्याकडे बोट दाखविले आहे़ १४४ ठिकाणी अर्ज करून माहिती घेण्याची सूचना करण्यात आली आहे़
राहुरी तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील विद्यापीठाचे सिंचन क्षेत्र विचारले होते. माहितीच्या अधिकाराचे पंख छाटण्यासाठी विद्यापीठाने चक्क कृषी दर्शन डायरीची झेरॉक्स असलेली पाने पत्ते व फोननंबरसह माहितीच्या अधिकारात पाठविली आहेत.
कृषी विद्यापीठाने ठिबक व तुषार सिंचनाचे प्रकल्प राबविले आहेत. मुळा धरणातून विद्यापीठाच्या शेतजमिनी व संशोधनासाठी तब्बल ६०० दलघफू पाणी राखीव म्हणून दिले जाते़ त्यापैकी बरेच पाणी वाया जाते़ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वापरण्याचा सल्ला देणाºया विद्यापीठाकडे ठिबकचा वापर होत नसल्याची चर्चा आहे़
माहितीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी विद्यापीठ उडवाउडवीची लेखी उत्तरे देतात़ माहिती टाळण्याच्या प्रवृत्तीमुळे अधिकारी बदनाम होत आहेत़ अर्ज धुडकावून लावणे हे कायद्यााच्या विरूध्द आहे़ यासंदर्भात कुलगुरूंकडे अपील करण्यात येईल़
- कुमार डावखर, अध्यक्ष,
राहुरी तालुका भारतीय संसद
विद्यापीठाचे कार्यक्षेत्र दहा जिल्ह्यासाठी असल्याने माहिती राहुरीत उपलब्ध नाही़ प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र अधिकारी आहे़ त्यामुळे नाव व पत्त्यासह यादी देण्यात आली आहे़ संबंधित ठिकाणी स्वतंत्र अर्ज करून माहिती उपलब्ध करून द्यावी.
- विठ्ठल शेंडे, सहयोगी संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी