किरकोळ बाचाबाची वगळता श्रीगोंदा तालुक्यात शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:24 AM2021-01-16T04:24:54+5:302021-01-16T04:24:54+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील गव्हाणेवाडी, घुगल वडगाव येथील बाचाबाची व हमरीतुमरी वगळता मतदान शांततेत पार पडले. ५८ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ...
श्रीगोंदा : तालुक्यातील गव्हाणेवाडी, घुगल वडगाव येथील बाचाबाची व हमरीतुमरी वगळता मतदान शांततेत पार पडले. ५८ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८८ टक्के मतदान झाले.
एक लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ४९७ जागांसाठी एक हजार ९८ उमेदवारांचे नशीब ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आता कुणावर संक्रांत येते याकडे लक्ष लागले आहे.
वेळू, चिखलठाणवाडी येथील मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षक रवींद्र परदेशी, तहसीलदार प्रदीप पवार यांनी भेट दिली. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, अरविंद माने यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
वडाळी येथील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार, वांगदरी येथील मतदान केंद्रावर नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे, हिंगणी येथे जिल्हा परिषद सदस्य कोमल वाखारे, अजनूज येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गिरमकर, सुरेश क्षीरसागर, आढळगाव येथील मतदान केंद्रावर अनिल ठवाळ यांनी मतदानाचा हक्क बजावला.
----
बाचावाची आणि धक्काबुकी..
गव्हाणेवाडीत आमदार बबनराव पाचपुते व माजी आमदार राहुल जगताप यांच्या समर्थकांमध्ये मतदान सुरू असतानाच शाब्दिक बाचाबाची झाली. घुगल वडगाव येथील दत्तात्रय दांगडे यांनी आपणास धक्काबुकी केली असा आरोप नामदेव चव्हाण या मतदाराने केला आहे. भाजपचे दत्तात्रय दांगडे यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावर दत्तात्रय दांगडे यांनी या मारहाणीचा इन्कार केला आहे.
फोटो : १५ नागवडे
श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथे राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी मतदानाचा हक्क बजावला.