शेतकऱ्यांचा मोर्चा ही सरकारला चपराक
By Admin | Published: June 27, 2016 12:46 AM2016-06-27T00:46:58+5:302016-06-27T00:56:10+5:30
शिर्डी : कृषी कर्ज, बियाणे व अनेक शेतीविषयक समस्यांसाठी भाजपसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात काढलेला मोर्चा
शिर्डी : कृषी कर्ज, बियाणे व अनेक शेतीविषयक समस्यांसाठी भाजपसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात काढलेला मोर्चा ही सरकारच्या दाव्यांवर सणसणीत चपराक असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली़ किमान आतातरी सरकारने आत्मपरीक्षण करून कारभारात सुधारणा करावी, असा सल्लाही त्यांनी दिला़
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे भाजप आमदार राजेंद्र नजरधने यांच्या महागाव येथील कार्यालयावर रविवारी निघालेल्या मोर्चासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे म्हणाले की, कृषी कर्ज आणि बियाणे मिळत नसल्याच्या मागणीसह इतरही अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महागाव येथे शेतकऱ्यांनी भाजप आमदाराच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यात शेतकरीच नाही तर इतर राजकीय पक्षांसह भाजपाचे कार्यकर्तेही सहभागी झाले. या मोर्चातील भाजपचा सहभाग हा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारसाठी घरचा आहेर आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचे विरोधी पक्ष, माध्यमे आणि शेतकरी वारंवार सांगत आहेत. मात्र, सरकार सर्वांना खोटे ठरवून आपलीच पाठ थोपटून घेत होते. आता या मोर्चाने सरकारच्या अपयशावर शिक्कामोर्तब झाले आहे़ या मोर्चावर झालेल्या लाठीमाराचा विखे यांनी तीव्र शब्दात निषेध करत चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी केली़ कर्जमाफी, कृषी कर्ज, बियाणे देवू शकत नसाल तर लाठीमार तरी करू नका, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची हौस नाही, त्यांच्यात असंतोष आहे, याची सरकारने वेळीच दखल घ्यावी, असा इशाराही विखेंनी दिला़
पुण्यासाठी अजून एका पैशाची तरतूद झालेली नसताना उद्घाटन व जाहिरातबाजीसाठी साडेतीन कोटी रूपये उधळणे संतापजनक आहे. पंतप्रधानांकडे स्मार्ट सिटीसाठी पुण्याचा दौरा करायला वेळ आहे; मात्र दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी वेळ नाही, हे दुर्दैव आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी दुष्काळाबाबत चकार शब्द काढला नाही. याचाच अर्थ त्यांना शेतकऱ्यांबाबत अजिबात आस्था नाही़ सर्वसामान्य जनता व विरोधकांची मुस्कटदाबी करुन हे सरकार फार काळ चालू शकणार नाही.
जलयुक्त शिवार आणि स्मार्ट सिटी व्यतिरिक्त सरकारकडे दुसरा कोणताही कार्यक्रम नाही. स्मार्ट सिटी योजना म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक असून बिल्डरांचे वर्चस्व निर्माण करण्याचाच सरकारचा हेतू असल्याची टीका त्यांनी केली.
(तालुका प्रतिनिधी)