पदयात्रींना मिळणार थेट साईदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 03:03 PM2019-09-15T15:03:34+5:302019-09-15T15:03:52+5:30
पालखी घेऊन येणा-या पदयात्रींना प्राधान्यक्रमाने थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय साईसंस्थानने घेतला आहे़ येत्या पुण्यतिथी (विजयादशमी) उत्सवापासून पदयात्रींना याचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल, असे संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी शनिवारी सांगितले़
शिर्डी : पालखी घेऊन येणा-या पदयात्रींना प्राधान्यक्रमाने थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय साईसंस्थानने घेतला आहे़ येत्या पुण्यतिथी (विजयादशमी) उत्सवापासून पदयात्रींना याचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल, असे संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी शनिवारी सांगितले़
शेकडो किलोमीटर पायी चालत साईदर्शनाला येणाºया भाविकांचे दर्शन आनंददायी व्हावे यासाठी ‘लोकमत’ने संस्थान, व्यवस्थापन व प्रशासनाचे लक्ष वेधले होत़े या मागणीचा सकारात्मक विचार करत संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी पदयात्रींना स्वतंत्र गेटची व्यवस्था करून थेट दर्शन उपलब्ध करून देण्यास अनुकूलता दर्शवली.
दरम्यान लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने व्यवस्थापनाची बैठक होण्याची शक्यता नाही़ त्यानंतरचे किमान दोन-अडीच महिने व्यवस्थापनाची बैठक होणार नाही़ त्यातच पुढील महिन्यात साई पुण्यतिथी उत्सव आहे़ या निमित्ताने पालख्या घेऊन अनेक पदयात्री शिर्डीला येत असतात त्यांना थेट दर्शनाचा लाभ मिळणार नाही़ त्यामुळे तात्त्काळ निर्णय घेणे गरजेचे असल्याचे अध्यक्ष डॉ़हावरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले. या निर्णयाची येत्या पुण्यतिथी उत्सवापासून अमंलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरात देशाच्या विविध भागातील साडेसहाशे पालख्याद्वारे दोन लाखांहून अधिक भाविक पदयात्रेने साईदर्शनासाठी येत असतात़ यानिमित्ताने पदयात्री मंडळांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होईल, असे डॉ़ हावरे यांनी सांगितले़
असा मिळेल लाभ
थेट दर्शनाचा सुविधेचा लाभ घेण्यासाठी पदयात्रेने येणा-या भाविकांच्या पालखी मंडळांना संस्थानकडे अधिकृत नोंदणी करावी लागेल. पालखी निघण्याची, पोहोचण्याची व दर्शन केव्हा घेणार याबाबतची माहितीही संस्थानच्या संबंधित विभागाला द्यावी लागेल़ याशिवाय पदयात्रींना त्यांच्या पालखी मंडळाचे ओळखपत्रही दर्शनासाठी जातांना दाखवावे लागेल.