श्रीगोंद्यातील १४ छावण्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 04:54 PM2019-04-05T16:54:53+5:302019-04-05T16:56:07+5:30

श्रीगोंदा : नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील भरारी पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील जनावरांच्या छावण्यांची तपासणी केली़ दहा छावणी चालक संस्थांवर दंडात्मक ...

 Penal action on 14 camps in Shrigonda | श्रीगोंद्यातील १४ छावण्यांवर दंडात्मक कारवाई

श्रीगोंद्यातील १४ छावण्यांवर दंडात्मक कारवाई

श्रीगोंदा : नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील भरारी पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील जनावरांच्या छावण्यांची तपासणी केली़ दहा छावणी चालक संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, गुरुवारी श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र महाजन यांनीही मांडवगण परिसरातील छावण्यांची तपासणी करुन चार संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल पाठविला आहे़
श्रीगोंदा तालुक्यात ४७ जनावरांच्या छावण्यांमध्ये सुमारे २७ हजार लहान, मोठी जनावरे आहेत़ यावर शासनाचे दररोज १७ लाख रुपये खर्च होत आहेत़ अशा परिस्थितीत नियम मोडणाऱ्या छावणी चालकांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे़ त्यामुळे छावणी चालकांची धावपळ सुरू झाली आहे़
छावणीवर अग्नीशामक दलाची सुविधा नाही़ विजेचे अधिकृत मीटर नाही़ लहान, मोठी जनावरांची नोंदणी नसणे तसेच त्यांना बिल्ले नसणे, अशा विविध कारणांमुळे छावणी चालकांवर कारवाई करण्यात आली असून, असुविधांनुसार २ ते ५ हजार रुपये दंड आकारुन सुधारणा करण्याच्या लेखी सुचना छावणी चालकांना दिल्या आहेत़
स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान (श्रीगोंदा), तांदळेश्वर मजूर संस्था (महांडुळवाडी), जय जवान शेळीपालन संस्था (बांगर्डे), जगदंबा ग्रामीण पतसंस्था (रुईखेल), गंगामाता मजूर संस्था (घोगरगाव), भैरवनाथ प्रतिष्ठान (वडघुल), पिसोरे खांड विविध कार्यकारी सेवा सोसायटी, भैरवनाथ युवा मंच (सारोळा सोमवंशी), जगदंब प्रतिष्ठान (घोगरगाव), नवनाथ वाचनालय (कामठी) या छावणी चालक संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़
तर तहसिलदार महेंद्र महाजन यांनी बाळराजे (थिटे सांगवी), विश्वनाथ मजूर (पिसोरेखांड), ओम चैतन्य (मांडवगण) या संस्थावर दंडात्मक कारवाई करण्याचा अहवाल तयार केला आहे. कोळगाव परिसरातील अन्य काही संस्थांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़ पण त्याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही़

Web Title:  Penal action on 14 camps in Shrigonda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.