विकासाला गती देण्यासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्यक- राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 12:32 PM2018-01-27T12:32:36+5:302018-01-27T12:33:29+5:30
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल टंचाईमुक्तीच्या दिशेने सुरु आहे. याशिवाय, कृषी योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने चांगले काम केले आहे.
अहमदनगर : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याची वाटचाल टंचाईमुक्तीच्या दिशेने सुरु आहे. याशिवाय, कृषी योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने चांगले काम केले आहे. या कामांना अधिक गती देण्यासाठी सक्रीय लोकसहभाग आवश्यक आहे, असे राज्याचे मृद व जलसंधारण तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस परेड मैदानावर झाला. यानिमित्त पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शानदार संचलन झाले. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली. त्यानंतर स्मार्ट ग्राम पुरस्कार, क्रीडा पुरस्कार आणि अहमदनगर पोलीस दलातील विशेष तपासात चांगली कामगिरी करणा-या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, मागील तीन वर्षात जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण व मृदसंधारण कामांची लोकसहभागातून परिणामकारक अंमलबजावणी करण्यात आली. पहिल्या वर्षी २७९ गावांमध्ये या कामांमुळे साधारणपणे ५९ हजार ३३३ टीसीएम इतका पाणीसाठा निर्माण झाला. त्यामुळे १ लाख १८ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रासाठी संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण १ लाख ८४ हजार ३९ शेतकºयांना ५२३ कोटी ८० लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना, शाश्वत सिंचनासाठी प्रयत्न, मागेल त्याला शेततळे, बी-बियाणे खतांचा पुरेसा पुरवठा, तंत्रज्ञानाचा वापर, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतक-यांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत असल्याचे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, वामनराव कदम, ज्योती कावरे, तहसीलदार गणेश मरकड, सुधीर पाटील, आप्पासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात विविध विभागांची माहिती देणारे चित्ररथ लक्षवेधी ठरले. त्याचबरोबर विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संग्राम जाधव, उपनिरीक्षक संदीप कहाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, दिलीप पवार, सुनील पवार, विलास पाटील, एस. आर. जांभळे, सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, सहायक फौजदार रत्नाकर मकासरे, पोलीस निरीक्षक एस. आर. जांभळे (निवृत्त) यांना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरवण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नगर उप विभागीय अधिकारी उज्वला गाडेकर, नेवासा उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामन कदम, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार राजेंद्र थोटे, उपनिबंधक (मुद्रांक) भालेराव, तहसीलदार गणेश मरकड, सुधीर पाटील उपस्थित होते.
सावेडीत अपर जिल्हाधिकारी पालवे यांच्या हस्ते ध्वजारोहण
सावेडी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमास तहसीलदार आप्पासाहेब शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही. एन. ताम्हणे, दत्तात्रय भापकर, जिल्हा कोषागार अधिकारी महेश घोडके, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधीक्षक कीर्ति जमदाडे, सहाय्यक वनसरंक्षक बी. जे. निमसे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी दिनेश काळे, पोलीस निरीक्षक एस आर पवरे, सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता आनंद नरखेडकर उपस्थित होते.