लसीकरणासाठी शहरातील लोक खेड्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:21 AM2021-05-12T04:21:39+5:302021-05-12T04:21:39+5:30
सध्या केवळ सरकारी लसीकरण केंद्रावरच लसीकरण सुरू आहे. या केंद्रांना ही अगदीच किरकोळ लसीचे वितरण होत आहे. त्यातही नियमितपणाच ...
सध्या केवळ सरकारी लसीकरण केंद्रावरच लसीकरण सुरू आहे. या केंद्रांना ही अगदीच किरकोळ लसीचे वितरण होत आहे. त्यातही नियमितपणाच नाही. लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आलेली आहे.
कोरोनाच्या प्रकोपामुळे नागरिकच नाही तर राज्य व केंद्र सरकारही हादरले आहे. कोरोनापासून बचाव करायचा असेल तर लसीकरण हाच खात्रीचा व अंतिम उपाय असल्याने प्रत्येकजण लस टोचून घेण्यासाठी आसुसलेले आहे.
शहरातील व सुशिक्षित नागरिक चपळाई करून ऑनलाईन नोंदणी करत आहेत. नोंदणीचे अॅप ओपन झाल्यावर अवघ्या काही मिनिटात लसीचा कोटा संपत आहे. दुसरीकडे खेड्यापाड्यातील लोक पहाटेपासूनच लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. मात्र अनेकांच्या नशिबी निराशाच येत आहे. ऑनलाईन पद्धत असल्याने अनेकजण खेड्यापाड्यातील किंवा अन्य तालुक्याच्या ठिकाणच्या सेंटरवर नोंदणी करत असल्याने खेड्यापाड्यातील केंद्रावर बाहेरून आलेले अनेकजण लसी घेताना दिसत आहे.
.....................
सलग दोन दिवस चार-चार तास कॉम्प्युटरवर बसलो. नाव टाईप करायच्या आत, काही मिनिटात कोटा संपत होता. सततच्या प्रयत्नानंतर नेवासा फाटा इथे नंबर लागला. तिथे लस घ्यायला गेलो तेव्हा तिथे माझ्यासारखे अनेकजण बाहेर गावाहून आले होते, काहीजण तर पुण्यातून आलेले होते. लसीकरण नोंदणी ऑनलाईन असली तरी तालुक्यातील लोकांनाच करता यायला हवी
- प्रमोद गोंदकर, सामाजिक कार्यकर्ता.
.............
आमच्याकडे लोक पहाटे पाच पासून रांगा लावत होते. साडेसहा वाजता जितक्या लस तितके टोकन वाटण्यात येत असे. रांगा लावणाऱ्यांपैकी जवळपास पन्नास टक्के लोकांनाच लस मिळायची. बुधवारपासून केवळ केंद्राच्या कार्यकक्षेतील गावातील नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाईल. शिर्डीच्या नागरिकांना राहाता ग्रामीण रूग्णालयात दुसऱ्या डोससाठी जावे लागेल.
- डॉ. संजय गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र