जिल्हा परिषदेत टक्केवारीची कामेच अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:26 AM2021-08-25T04:26:27+5:302021-08-25T04:26:27+5:30
नगर तालुक्यातील आगडगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार बबनराव ...
नगर तालुक्यातील आगडगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजी कर्डिले आदी उपस्थित होते. २०२२ पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत सर्वांना शुद्ध पाणी मिळणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकारणचा ठेका कोणाला द्यायचा यातून सहा महिन्यांपासून या योजनेची फाईल या सरकारने दाबून ठेवली आहे, असा टोला खासदार विखे यांनी आघाडी सरकारला लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार दिवसाला २० लाख लोकांचे लसीकरण करीत आहे. एखाद्या देशाची लोकसंख्याही २० लाख नाही, तेवढे लसीकरण आपण एका दिवसात करतो. यापुढील काळात गावोगावी, तसेच शहरात वॉर्डनिहाय लसीकरण केले जाईल. तालुक्यातील प्रत्येक रस्ता, बाह्यवळण रस्ता, सुरत महामार्ग आणि इतर महामार्गाने जोडला जात असल्याने तालुक्यातील युवकांना, शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. तालुक्यातील डोंगरी भागात तातडीने मोबाईल टॉवर उभारण्यावर भर दिला जाणार आहे, असेही विखे म्हणाले.
या वेळी आगडगाव येथील मारुती मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे, आगडगाव ते मोरदरा रस्ता, नगर ते मिरी रस्ता आदी विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, रेवण चोभे, पंचायत समिती सदस्य सुनीता भिंगारदिवे, भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे, आगडगावचे सरपंच मच्छींद्र कराळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
--------
फोटो - २४ आगडगाव
आगडगाव येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, अभिलाष घिगे, संतोष म्हस्के आदी.