महिला न्यायाधीशाचा पतीकडून छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 03:57 PM2018-12-05T15:57:32+5:302018-12-05T15:57:35+5:30
पतीकडून मानसिक छळ होत असल्याची फिर्याद पारनेरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पूजा कोकाटे यांनी मंगळवारी पारनेर पोलीस ठाण्यात दिली.
पारनेर:पतीकडून मानसिक छळ होत असल्याची फिर्याद पारनेरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पूजा कोकाटे यांनी मंगळवारी पारनेर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पतीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने न्यायालयीन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पारनेर येथील न्यायालयात पूजा नारायण कोकाटे या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आहेत. त्यांनी २ डिसेंबरला पती प्रवीण संताजी देवकर (रा. कोठे बाभूळसर, ता. शिरूर, जि. पुणे) याच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात फर्याद दिली आहे. ४ जुलै २०१० ते २ डिसेंबर २०१८ दरम्यान नांदत असताना तू वकील आहे, म्हणून तुझ्याबरोबर लग्न केले, असे म्हणून लोकांसमोर अपमान केला. तसेच तुझ्यााविरोधात सर्वोच्च व उच्च न्यायालयात खोट्या तक्रारी करेन, अशी धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी प्रवीण देवकर याच्या विरोधात मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कविता भुजबळ या पुढील तपास करीत आहेत.