केडगावात पेट्रोल चोरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:44+5:302021-02-24T04:22:44+5:30

केडगाव : एकीकडे पेट्रोलच्या दराने शंभरी गाठलेली असताना सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. अशा परिस्थीतीत केडगाव परिसरात मोटारसायकलमधील पेट्रोल ...

Petrol thieves in Kedgaon | केडगावात पेट्रोल चोरांचा सुळसुळाट

केडगावात पेट्रोल चोरांचा सुळसुळाट

केडगाव : एकीकडे पेट्रोलच्या दराने शंभरी गाठलेली असताना सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. अशा परिस्थीतीत केडगाव परिसरात मोटारसायकलमधील पेट्रोल चोरी करणाऱ्या चोरांचे प्रमाण देखील वाढलेले दिसून येत आहे. यात अल्पवयीन मुले असल्याचा संशय आहे.

केडगावमधील अपार्टमेंट असणाऱ्या भागात पार्किंगमधील वाहनांचे पट्रोल चोरीला जात असल्याची माहिती नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली.

साधारण १४ ते १७ वयोगटातील काही मुले अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पार्किंगमधील दुचाकी गाड्यांचे रात्रीच्या वेळेस पूर्व नियोजन करून पडताळणी करून पेट्रोल चोरीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात काही सजग नागरिकांनी प्रत्यक्षात पेट्रोल चोरताना काही अल्पवयीन मुले पकडली देखील आहेत.

या मुलांचे वय अल्पवयीन त्यात ते शाळा शिकणारी मुले, त्यांना पकडल्यावर निरागस चेहरे करून गयावया करतात. यामुळे पोलीस कार्यवाही केल्यास मुलांच्या भवितव्यावर परिणाम होईल, या भावनेने नागरिक या मुलांबाबत पोलिसात तक्रार देत नाहीत. याचाच गैरफायदा घेत ही मुले जिथे पकडले तो परिसर बदलून किंवा इमारत बदलून चोरी करीत आहेत. पेट्रोल चोरीचे प्रकार काही थांबत नाहीत असे दिसून आले आहे.

याबाबत काही चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांना पकडल्यावर त्यांच्या पालकांना बोलावून नागरिकांनी त्यांना समज दिली आहे. परंतु संबंधित पालक याबाबत त्यांच्या मुलांवर नियंत्रण ठेवण्याबाबत असमर्थ असल्याचे दिसत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

मागील आठवड्यात अंबिकानगरमधील श्रीकृष्ण अपार्टमेंट येथे देखील पेट्रोल चोरी करताना काही अल्पवयीन मुले पकडली होती.

....

एक तर नियमबाह्य पद्धतीने अल्पवयीन मुलांचे पालक मुलांना वय नसताना देखील मोटारसायकल उपलब्ध करून देत आहेत. मौजमजा करण्याच्या नादात मुले पेट्रोल चोरून दिवसभर उनाडक्या करीत फिरत आहेत. याबाबत खर तर अशी केडगाव परिसरात जी अल्पवयीन मुले मोटारसायकल वापरीत आहेत. त्यांच्या पालकांवरच कडक कार्यवाही करण्याची गरज आहे. या मुलांना कायदेशीर खाक्या दाखवणे देखील गरजेचे आहे. त्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत.

-दीपक बारदे, नागरिक, केडगाव.

...

अंबिकानगर येथील आदित्य रेसिडेन्सी येथे पेट्रोल चोरी करताना बिल्डिंगमधील नागरिकांनी मुले पकडली होती. त्यांच्या पालकांना याबाबत कडक समज दिली होती. शे- पाचशे रुपयांच्या पेट्रोल चोरी साठी परिसरातील नागरिक मुलांवर कार्यवाही करीत नाहीत. तरी परिसरातील नागरिकांनी या मुलांना किरकोळ घटना व नुकसान समजून पाठिशी न घालता सरळ कायदेशीर कार्यवाही करुन पायबंद घालावा.

-सुनील गिरी, नागरिक, केडगाव.

..

Web Title: Petrol thieves in Kedgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.