भा.पा.हिवाळे शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष फिलीप बार्नबस यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 11:45 AM2021-01-11T11:45:25+5:302021-01-11T11:47:54+5:30
अहमदनगर येथील भा.पा.हिवाळे शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, सचिव फिलीप बार्नबस यांचे शनिवारी (दि.९) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
अहमदनगर : येथील भा.पा.हिवाळे शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, सचिव फिलीप बार्नबस यांचे शनिवारी (दि.९) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
अहमदनगर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिवंगत टी.बार्नबस व जे. बार्नबस यांचे धाकटे बंधू फिलीप बार्नबस यांनीही समाजकार्यात आपले आयुष्य वाहून घेतले होते.
टाटा इन्सटिट्यूट, मुंबई येथून समाज कार्य अभ्यासक्रमात विशेष प्राविण्यासह त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पुढे अमेरिकेत जाऊन शिकागो विद्यापीठात समाजकार्य विषयातील उच्च शिक्षणही त्यांनी घेतले.
बार्नबस कुटुंबातून वंशपरंपरेने चालत आलेल्या सेवाभावी वृत्तीचा वारसा पुढे चालवत सोलापूर येथील मराठी मिशनच्या ख्रिस्त सेवा समाजकल्याण या संस्थेच्या माध्यमातून समाज कार्याला त्यांनी सुरुवात केली. सस्थेवर जवळपास चाळीस वर्षे ते संचालक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर मराठी मिशनच्या नागपाडा नेबरहुड हाऊस, मुंबई व पुणे येथील सोसायटी ऑफ सेंट मेरी ह्या संस्थेतही त्यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले.
प्रशासन व समाज कार्याचा दांडगा अनुभव असलेल्या फिलीप बार्नबस ह्यांनी २००५-०६ मध्ये नगर येथील भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेचे काम पाहण्यास सुरुवात केली. हिवाळे शिक्षण संस्थेमध्ये अध्यक्ष व सचिव अशा महत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांच्या कार्यकाळात संस्थेच्या अहमदनगर विद्यालय, सी एस आर डी व आय.एम.एस ह्या संस्थांनी गुणवत्तेचे नवनविन शिखर गाठले.
आय.एम.एस. येथील प्राध्यापक डॉ.विक्रम बार्नबस व महिंद्रा लॉजिस्टिक्स कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी विशाल बार्नबस यांचें ते वडिल होत. अहमदनगर महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांचें ते काका होते.